सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी; ई-मेलमध्ये सलमान खानचंही नाव
पंजाब पोलिसांनी ज्या 424 जणांची सुरक्षा तात्पुरती काढून घेतली होती, त्यात सिद्धूचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली होती.
मुंबई : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी त्यांना ई-मेलद्वारे मिळाली आहे. या ई-मेलमध्ये बलकौर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोईसारख्या गँगस्टरचं नाव न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये अभिनेता सलमान खानचंही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. या पत्रात सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
राजस्थानवरून आला ई-मेल
सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांना आहे. हा ई-मेल राजस्थानवरून पाठवला गेल्याचं कळतंय. मात्र याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांनी या धमकीबाबत नकारही दिला नाही किंवा त्याला दुजोराही दिलेला नाही.
गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी
सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई-मेलद्वारे अशाच पद्धतीची धमकी देण्यात आली होती. तेव्हासुद्धा लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याविषयी काही बोलल्यास जीवे मारणार असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र अशा धमकांनी घाबरणार नाही, असं बलकौर सिंह म्हणाले होते.
गेल्या वर्षी 29 मे रोजी पंजाबमधील मनसा याठिकाणी सिद्धू मूसेवालावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सिद्धू त्याच्या मित्रांसोबत जीपमधून गावी जात होता. त्यावेळी काही लोकांनी त्याच्या गाडीला घेरलं आणि गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. गायक शुभदीप सिंग सिद्धू हा सिद्धू मूसेवाला म्हणून ओळखला जायचा.
पंजाब पोलिसांनी ज्या 424 जणांची सुरक्षा तात्पुरती काढून घेतली होती, त्यात सिद्धूचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.