Lucky Ali: लकी अली यांच्या जमिनीवर IAS अधिकारी असलेल्या पत्नीच्या मदतीने अवैध अतिक्रमण; पोस्ट लिहित मागितली मदत
जिथे 50 वर्षांपासून राहत आहेत लकी अली, त्याच जमिनीला बळकावण्याचा प्रयत्न; भूमाफियांविरोधात उठवला आवाज
बेंगळुरू: प्रसिद्ध गायक लकी अली यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित बेंगळुरूतील भूमाफियाविरोधात आवाज उठवला आहे. बेंगळुरूमधील भूमाफिया त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. गेल्या 50 वर्षांपासून मी तिथे राहतोय आणि आता काही लोक त्या जमिनीवर अतिक्रमण करत आहेत, असं त्यांनी लिहिलंय. या पोस्टमध्ये त्याने सुधीर रेड्डी नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. आयएएस अधिकारी असलेल्या पत्नीच्या मदतीने ते अतिक्रमण करत असल्याचा आरोप लकी अली यांनी केला आहे.
‘सुधीर रेड्डी हे माझ्या शेतजमिनीवर अतिक्रमण करत आहेत. यात त्यांची पत्नी रोहिणी सिंधुरी साथ देत आहे, जी IAS अधिकारी आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते राज्याच्या संसाधनांचा गैरवापर करत आहेत’, अशी तक्रार लकी अली यांनी आपल्या पोस्टमध्ये केली.
या अतिक्रमणाविरोधात त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली, मात्र त्यांच्याकडून कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे लकी अली यानी कर्नाटकच्या डीजीपींकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. ‘मला पोलिसांकडून मदत मिळत नाहीये. उलट तेच भूमाफियाची साथ देत आहेत. मी सध्या महत्त्वाच्या कामानिमित्त दुबईत आहे. माझे कुटुंबीय आणि लहान मुलं तिथे राहत आहेत. कर्नाटकातील केंचेनाहल्ली येलहंका परिसरात माझी प्रॉपर्टी आहे. भूमाफिया सुधीर रेड्डी आणि त्यांची पत्नी रोहिणी सिंधुरी हे माझ्या प्रॉपर्टीत अतिक्रमण करत आहेत’, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.
कायदेशीर बाबींचा विचार केला असता कोणत्याही कागदपत्रांशिवाय असं अतिक्रमण करणं बेकायदेशीर आहे. 7 डिसेंबरला होणाऱ्या कोर्टातील सुनावणीच्या आधीच अशा पद्धतीने केलं जाणारं अतिक्रमण रोखण्यात यावं. कृपया माझी मदत करा. माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
लकी अली यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लकी अली यांना न्याय मिळावा अशी मागणी चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये केली आहे.