लाखो दर्दींच्या हृदयातला आवाज हरपला, श्रीमंतांच्या मैफिलीतच नाही तर रिक्षा, ट्रकमध्ये गुंजायची गाणी
देशातल्या लाखो दर्दींच्या हृदयात एक मोठा पीळ पळावा अशी घटना आज घडलीय. लाखो चाहत्यांच्या मनाच्या संवेदनशील कोपऱ्यातला एक चेहरा आज हरपला. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं आज निधन झालंय.
जालना | 26 फेब्रुवाराी 2024 : देशातल्या लाखो दर्दींच्या हृदयात एक मोठा पीळ पळावा अशी घटना आज घडलीय. लाखो चाहत्यांच्या मनाच्या संवेदनशील कोपऱ्यातला एक चेहरा आज हरपला. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं आज निधन झालंय. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होते. दीर्घ आजारामुळे पंकज उधास यांचं आज निधन झालंय. पंकज उधास हे गझल गायक म्हणून प्रचंड प्रसिद्ध होते. पंकज बालपणापासून गाणं गात होते. ते 6 वर्षांचे होते तेव्हापासून गाणं गात होते. त्यांचे वडील आणि मोठे बंधू हे संगीत क्षेत्रातशी जोडले गेले होते. त्यामुळे पंकज उधास हे देखील संगीत क्षेत्राकडे आकर्षित झाले. पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी झाला होता. पंकज उधास यांना 1972 मध्ये ‘कामना’ चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली होती. उधास यांचं ते गाणं सुपरहीट ठरलं होतं. उषा खन्ना यांनी पंकज उधास यांना ही संधी दिली होती. पंकज यांनी त्यावेळी ‘तुम कभी सामने आ जाओगे तो पुछूं तुमसे’ हे गाणं गायलं होतं. त्यावेळी पंकज हे 21 वर्षांचे होते. त्यावेळी त्यांचं महाविद्यालयात शिक्षण सुरु होतं.
पंकज उधास यांनी गुजरातच्या राजकोट येथील संगीत नाट्य अकादमीमध्ये तबला वाजवायचं प्रशिक्षण घेतलं होतं. भारती-चीन युद्धाच्या वेळी पहिल्यांदा पंकज उधास यांना मोठ्या मंचावर गाणं गाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पंकज यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं गायलं होतं. त्यांच्या आवाजाने प्रभावित होऊन एका श्रोत्याने त्यांना त्यावेळी 51 रुपये बक्षीस म्हणून दिले होते. संगीत क्षेत्रातली पंकज उधास यांची त्यावेळी ही पहिली कमाई होती.
अनेक गाणी हिट ठरली
पंकज उधास यांचं ‘साजन’ चित्रपटातील ‘जिए तो जिएं कैसे’ हे गाणं चांगलंच हिट ठरलं होतं. तसेच ‘नाम’ चित्रपटातलं ‘चिठ्ठी आई है’ हे गाणं आजही लोक गुणगुणत असतात. पंकज उधास यांनी गायलेली ‘चांदी जैसा रंग है तेरा’ हे गाणं श्रोत्यांच्या काळजाला हात घालतं. त्यांनी गायलेली ही गझल प्रचंड प्रसिद्ध झाली. पंकज यांची ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ ही गझल लोकांनी खूप डोक्यावर घेतली. अगदी हायवेवर धावणाऱ्या ट्रकपासून ते ऑटो रिक्षामध्ये अनेकदा ही गझल ऐकायला मिळते.
पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमधून शाहरुख खानला मिळाला होता पहिला पगार
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याला संपूर्ण जग आज ओळखतं. इंडियन एक्सप्रेसमध्ये एकदा लेख छापून आला होता. त्यामध्ये याबाबत उल्लेख करण्यात आला होता. पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमधून शाहरुख खानला पहिला पगार मिळाला होता. त्यावेळी शाहरुखला 50 रुपये मानधन मिळालं होतं. अभिनेता जॉन अब्राहम याला पंकज उधास यांनीच आपल्या गझलमध्ये पहिला ब्रेक दिला होता. ‘चुपके चुपके सखियों से वो बातें करना भूल गई’, अशी ती गझल होती. तर अभिनेत्री समीरा रेड्डी हिला देखील पहिला ब्रेक पंकज उधास यांच्या ‘और आहिस्ता कीजिए बातें’मध्ये मिळाला होता. या गाण्याचा व्हिडीओ 90 च्या दशकातील प्रत्येक मुलाला आठवत असेल.