Jayant Savarkar | ‘सिंघम’ अभिनेते जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; कलाविश्वावर शोककळा
'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'अरे वेड्या मना', 'अस्मिता', 'आई कुठे काय करते' या मालिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. स्वप्नील जोशीच्या 'समांतर' या वेब सीरिजमध्येही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सर्वच पातळीवर त्यांनी आपला ठसा उमटविला होता.
मुंबई | 25 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. ठाण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जयंत यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी सांगितलं, “रक्तदाब कमी झाल्याने त्यांना 10-15 दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं होतं. अखेर सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”
पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार
सावरकर यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) दुपारी 12.30 वाजता ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयंत सावरकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
जयंत सावरकर यांची कारकिर्द
अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी जवळपास 12 वर्षे पडद्यामागील कलाकार म्हणून काम केलं. त्यांनी आजवर 100 हून अधिक मराठी नाटकांमध्ये तसंच 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. रंगभूमी किंवा चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असो किंवा मोठी, त्यांनी प्रत्येक भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून दाद मिळवली. पु. लं. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील त्यांची अंतू बर्वाची भूमिकाही गाजली होती.
गाजलेली नाटकं
रंगभूमीवर पदार्पण करण्याआधी जयंत सावरकर हे नोकरी करायचे. नोकरी करत नाटकाचं वेड जपणाऱ्या जयंत यांनी एका क्षणाला नोकरी सोडून पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. ‘एकच प्याला’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकांमध्ये त्यांनी दमदार काम केलं.
मालिका आणि वेब सीरिजमध्येही उमटविला ठसा
नाटक आणि चित्रपटांशिवाय ते मालिकांमध्येही झळकले. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’ या वेब सीरिजमध्येही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सर्वच पातळीवर त्यांनी आपला ठसा उमटविला होता.