आंतरधर्मीय लग्न करताना सोनाक्षीने डोक्यात ठेवली ‘ही’ गोष्ट; म्हणाली “खूप आधीपासूनच..”
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी लग्न केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या एका पार्टीत या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं हळूहळू रुपांतर प्रेमात झालं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ लग्नसोहळ्यापूर्वी सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सोनाक्षी आणि झहीरने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘विशेष विवाह कायद्या’अंतर्गत लग्न केलं आणि त्यानंतर जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या लग्नाविषयी सोनाक्षी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धूमधडाक्यात लग्न का केलं नाही, यामागचं कारण तिने सांगितलं आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांसोबत होतो आणि खूप आधीपासूनच आम्ही या गोष्टीवर ठाम होतो की लग्न असंच करायचं. सगळ्या गोष्टी कशा हव्यात, याविषयी आमच्या डोक्यात खूप स्पष्टता होती. छोटेखानी आणि मोजक्या जवळच्या लोकांसमोरच लग्न पार पडावं, अशी आमची इच्छा होती. पण रिसेप्शन पार्टीत प्रत्येकाला मनसोक्त एंजॉय करता यावं, असा प्लॅन होता.” सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी मुंबईतल्या ‘बॅस्टियन’ या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सलमान खान, रेखा, अनिल कपूर यांसह बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.
View this post on Instagram
“आम्हाला आमचं रिसेप्शन म्हणजे एक जंगी पार्टी हवी होती. जिथे सर्वजण मनसोक्त नाचू शकतील. मला लग्नाचा कोणताही तणाव घ्यायचा नव्हता. त्यामुळे माझं घर सर्वांसाठी खुलं होतं. प्रत्येकजण घरात मोकळेपणे ये-जा करू शकत होता. माझा मेकअप होतानाही पाहुणे निवांतपणे इथे-तिथे फिरू शकत होते. मित्रमैत्रिणी घरात मोकळेपणे वावरत होते. डेकोरेशन चाललं होतं, जेवण बनत होतं. त्यामुळे माझं लग्नाचं घर प्रत्येकासाठी खुलं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस मला असाच पाहिजे होता. मला घराचं घरपण अनुभवायचं होतं आणि ते सर्व खूप सुंदर होतं”, अशा शब्दांत ती पुढे व्यक्त झाली.
विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करताना सोनाक्षीने तिच्या आईची चिकनकारी साडी नेसली होती. तर रिसेप्शनला तिने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. लग्नाच्या कपड्यांमध्येही नाचता यावं आणि सहज वावरता यावं, यासाठी भरजरी पर्याय नाकारल्याचं तिने स्पष्ट केलं. “मला कम्फर्टेबल राहायचं होतं आणि मला माझ्याच लग्नात मनसोक्त नाचायचं होतं म्हणून मी साधेच कपडे परिधान केले होते”, असं सोनाक्षीने सांगितलं.