न्यू इअर सेलिब्रेशनच्या व्हिडीओमुळे सोनाक्षी-झहीर तुफान ट्रोल; दिवाळीची पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनी सुनावलं
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनी ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र त्यावरून सोनाक्षी आणि झहीरला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..
जगभरात नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आलं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जल्लोष केला, विविध ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने पती झहीर इक्बालसोबत ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं. लग्नानंतर हे दोघं विविध ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं ऑस्ट्रेलियांमध्ये असून सिडनीमध्ये त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. याचा व्हिडीओ सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. सिडनीमधील अत्यंत सुंदर ठिकाणी हे दोघं गेले होते. 31 जानेवारीला रात्री 12 चा ठोका वाजताच सोनाक्षी आणि झहीर यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांनी एकमेकांना किस केलं. सिडनीत ज्याठिकाणी हे दोघं उभे होते, तिथे मागे फटाके फुटत असल्याचं आणि आतिषबाजी होत असल्याचं पहायला मिळालं. सोनाक्षीच्या या व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
सोनाक्षीला ट्रोल करण्यामागचं कारण म्हणजे 2024 च्या दिवाळीला सोनाक्षीने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे तिने दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना मूर्ख असं म्हटलं होतं. ‘फटाक्यांमुळे हवा अशी दिसतेय पहा. जे लोक फटाके फोडत आहेत त्यांना मी विचारू इच्छिते की, तुम्ही सर्वजण मूर्ख आहात का’, असं तिने लिहिलं होतं. सोनाक्षीची हीच पोस्ट पुन्हा शेअर करत चाहते तिला ‘ढोंगी’ असं म्हणतायत. या ट्रोलिंगमध्ये सोनाक्षीने तिच्या व्हिडीओवरील कमेंट्स बंद केले आहेत. तरीसुद्धा नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ आणि दिवाळीदरम्यानची पोस्ट रेडिटवर शेअर करून तिथे ट्रोल करण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
‘फटाके फोडल्याने फक्त दिवाळीतच प्रदूषण होतं का? आता नवीन वर्षात फटाके फोडल्याने त्यातून ऑक्सिजन बाहेर पडतं का? हा किती दुटप्पीपणा आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्राण्यांचं काय? सेलिब्रिटी नेहमी म्हणतात की फटाक्यांमुळे प्राणी घाबरतात आणि दिवाळीत आपण ते फोडू नयेत. आता ऑस्ट्रेलियामध्ये प्राणी नाहीत का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.
सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून रोजी लग्न केलं. लग्नापूर्वी दोघं सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र आपल्या रिलेशनशिपविषयी यांनी उघडपणे कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर ‘तू है मेरी किरण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक करण रावल या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.