‘अनेकवेळा वाटतं मुंबईतील मराठी माणसं संपून चालली का?’; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठी माणसाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मराठी माणूस हा अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आहे. तसेच तो स्वाभिमानीदेखील आहे. मुंबईत मराठी भाषिक नागरीक असल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन होतं. मुंबईतील दहीहंडी उत्सव हे त्याचं उदाहरण आहे. पण तरीदेखील मुंबईत मराठी माणसं कमी होत आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिलादेखील हा प्रश्न सतावतो. तिने आज याबाबत भाष्य केलं आहे.
मुंबईत दहीहंडीचा प्रचंड उत्साह बघायला मिळतोय. मुंबईत अनेक ठिकाणी मानाच्या दहीहंडींचं आयोजन केलं जातं. दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील मोठमोठ्या बक्षीसांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमांना चित्रपटसृष्टीतील कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत. मुंबईतील मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडूनही दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील हजेरी लावली. या दरम्यान सोनाली कुलकर्णीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना मराठी माणसाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“दहीहंडीबद्दल कडक अशा भावना आहेत. मराठमोळ्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे. अनेकवेळा वाटतं मुंबईतील मराठी माणसं संपून चालली का? पण अशा उत्सवातून कळतं की, अशी उत्सव मराठी माणसांना एकत्र आणतात. आपली संस्कृती टिकून ठेवायची असेल तर आपण एकत्र येऊन सण साजरे केले पाहिजेत”, अशी भावना सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केली.
सोनाली बदलापूरच्या घटनेवर काय म्हणाली?
सोनाली कुलकर्णीने बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “देशभरात ही स्थिती आहे. आपले कायदे बदलत नाहीत तोपर्यत क्रांती घडणार नाही. मुलींना सुरक्षित राहायला हवं असेल तर आरोपीला लवकर शिक्षा व्हायला हवी. एकदा उदाहरण लोकांना दिलं पाहिजे. जोपर्यंत लोकांना कळत नाही की याची शिक्षा कडक होते तोपर्यंत गांभीर्य कोणाला कळणार नाही”, अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णी हिने दिली.
दरम्यान, मुंबईतील मराठी माणसं कमी झाली, अशी चर्चा नेहमी होत असते. मुंबईत मराठी माणसं कमी झाले हे काही अंशी खरं देखील आहे. कारण मुंबईत घरांच्या किंमतीना प्रचंड भाव आहे. याशिवाय खूप लहान घरांमध्ये राहवं लागतं. यामुळे अनेक मराठी माणसांनी आपली मुंबईतील लहान घरं विकली आणि ते कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार या शहरांमध्ये स्थायिक झाले. तिथून मुंबईकर कामासाठी रोज ये-जा करतात.