‘बघून गहिवरुन येतंय’, सोनाली कुलकर्णीची भावनिक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली?
"आपली संस्कृती टिकवायची असेल तर सण, उत्सव अशाचप्रकारे साजरा व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपणच एकत्र आले पाहिजेत. मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल", अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णी हिने दिली.
मुंबईतील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी झाली. मुंबईतील दहीहंडी उत्सव पाहून सोनाली भारावली आहे. तिने कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं कौतुक केलं आहे. तसेच दहीहंडी उत्सवाचं वातावरण पाहून आपल्याला गहीवरुन आल्याचं सोनाली म्हणाली. “इतक्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र बघून खूप आनंद होतोय. गंमत अशी आहे की, आयोजकांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी इथे कलाकारही बोलवले आहेत. अगदी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सगळे मराठी कलाकार आहेत, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये सर्व कलाकार आहेत. त्यामुळे मराठी माणसांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. गोविंदा पथकांना हक्काचा उत्साह साजरा करता येतोय”, असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.
“आपल्याला कायम असं वाटतं की, मुंबईत मराठी माणसं संपत चालली आहेत का? अशावेळेला गोपाळ दादा सारखी मराठी माणसं आणखी मराठा माणसांना एकत्र येतात आणि महाराष्ट्रातला अतिशय मानाचा उत्सव आहे, तो आपल्या सर्वांच्या हृदयातला उत्सव आहे. तो मराठमोळ्या पद्धतीने साजरा व्हावा, हा जो अट्टहास आज इथे बघायला मिळतोय ते बघून गहिवरुन येतंय”, अशी भावना सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केली.
सोनालीच्या दहीहंडीच्या आठवणी काय?
“मला दहीहंडीच्या लहानपणीच्या आठवणी नाहीत. पण जेव्हा मी प्रसिद्धीस आले, मला जेव्हापासून लोकं ओळखायला लागली तेव्हापासून मी महाराष्ट्रातील सर्व दहीहंडी उत्सवांना हजेरी लावत आहे. त्यानिमित्ताने हा उत्सव कसा साजरा होतो? ते पाहायला मिळत आहे. चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे आभार आहे. त्यांच्यामुळे मला ही संधी मिळते”, असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.
“आपली संस्कृती टिकवायची असेल तर सण, उत्सव अशाचप्रकारे साजरा व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपणच एकत्र आले पाहिजेत. मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल”, असंही सोनाली म्हणाली.
महिला अत्याचारावर सोनाली काय म्हणाली?
“नुसती महाराष्ट्रातच नाही तर देशभरात ही परिस्थिती आहे. देशभरातील कायदे जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत क्रांती कुठल्याही राज्यात घडणार नाही. प्रत्येक राज्यात बदल घडायला हवा. शिक्षा कडक असल्याशिवाय त्याचं गांभीर्य जाणवणार नाही. जोपर्यंत वरुन बदल घडत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम बघायला मिळणार नाही”, अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णीने दिली.