Sonali Phogat: सोनाली फोगाट यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित; ‘या’ नेत्यांनी केली चौकशीची मागणी, बहिणीचंही मोठं विधान
सोनाली यांच्या निधनाचं वृत्त मिळताच त्यांचे कुटुंबीय भूतानहून गोव्याला रवाना झाले आहेत. सोनाली या 22 ते 25 ऑगस्टदरम्यान पूर्वनियोजित गोवा दौऱ्यावर होत्या. टिकटॉक व्हिडिओमुळे त्या नेहमीच चर्चेत असायच्या.
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचं आज (मंगळवारी) गोव्यात (Goa) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. आता सोनाली यांच्या बहिणीने मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाली यांच्या बहिणीने सांगितलं की, सोनाली यांनी त्यांच्या आईला सोमवारी सकाळी फोन केला होता. या फोन कॉलमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, “मला माझ्या जेवणात काहीतरी गडबड वाटत आहे, माझ्या शरीरात काहीतरी गडबड होत आहे. जणू कोणी माझ्याविरोधात कट रचत आहे.” सोनाली यांच्या निधनाचं वृत्त मिळताच त्यांचे कुटुंबीय भूतानहून गोव्याला रवाना झाले आहेत. सोनाली या 22 ते 25 ऑगस्टदरम्यान पूर्वनियोजित गोवा दौऱ्यावर होत्या. टिकटॉक व्हिडिओमुळे त्या नेहमीच चर्चेत असायच्या.
सोनाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये अँकरिंगपासून केली होती. हिस्सार दूरदर्शनसाठी त्या अँकरिंग करत होत्या. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर आदमपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय फोगाट फार्म हाऊसमध्ये मृतावस्थेत आढळले होते. आम आदमी पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांनीही फोगाट यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला आहे. सोनाली फोगट यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं ते म्हणाले. सरकारने त्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर काँग्रेस नेते योगेश सिहाग म्हणाले की, “भाजपशासित गोव्यात भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या प्रकरणात कोणती तरी मोठी शक्ती नक्कीच आहे.”
View this post on Instagram
सोमवारी रात्री उशिरा त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. इन्स्टा रील्सवर विविध गाण्यांवर आपले व्हिडीओ पोस्ट करता येतात. सोनाली यांनी मोहम्मद रफींच्या ‘मेरे हुजूर’ चित्रपटातील ‘रुख से जरा नकब उठा दो मेरे हुजूर..’ या क्लासिक बॉलीवूड गाण्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा फेटा डोक्यावर बांधला होता. निधनाच्या जवळपास 12 तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या रील व्हिडीओमध्ये त्या मोकळेपणे हसताना पहायला मिळत आहेत. या व्हिडीओत त्या एकदम फिट दिसत असून त्यानंतर काही तासांनी त्यांचं अकस्मात निधन होईल याची कल्पनाही कोणी केली नसेल.