मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम यांच्या घरी चोरीची घटना घडली. याप्रकरणी त्यांच्या माजी ड्राइव्हरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाली होती. 76 वर्षीय आगमकुमार हे मुंबईतल्या अंधेरी इथल्या विंडसर ग्रँड इमारतीत राहतात. 19 आणि 20 मार्च रोजी ही चोरीची घटना घडली. बुधवारी सोनू निगमची बहीण निकिताने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आगमकुमार यांच्याकडे रेहान नावाच्या ड्राइव्हरने जवळपास आठ महिने काम केलं होतं. मात्र त्याचं काम समाधानकारक नसल्याने नुकतंच त्याला नोकरीवरून काढण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी 19 मार्च रोजी आगमकुमार हे मुलगी निकिताच्या वर्सोवा इथल्या घरी जेवायला गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना घरातील 40 लाख रुपये गायब झाल्याचं समजलं. त्यांनी घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलीला फोन करून याबद्दलची माहिती दिली. घरातील एका लाकडी कपाटातील डिजिटल लॉकरमध्ये हे पैसे ठेवले होते. दुसऱ्या दिवशी आगमकुमार हे व्हिसा संबंधित कामासाठी मुलाच्या घरी गेले आणि संध्याकाळी परतले. त्यादिवशी लॉकरमधून 32 लाख रुपये गायब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
घरातील 72 लाख रुपये गायब झाल्यानंतर आगमकुमार आणि निकिता यांनी सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात त्यांना माजी ड्राइव्हर रेहान हा चोरीच्या घटनेच्या दोन्ही दिवशी पाठीवर बॅग घेऊन त्यांच्या फ्लॅटकडे जाताना दिसला. बनावट किल्लीच्या सहाय्याने त्याने सोनू निगमच्या वडिलांच्या घरात प्रवेश केला आणि डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरले. निकिताच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी ड्राइव्हरविरोधात एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
सोन निगमने बॉलिवूडला एकापेक्षा एक गाणी दिली आहेत. त्याची गाणी आणि त्याचा आवाज भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्याने हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 2003 मध्ये सोनू निगमला ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अग्निपथ चित्रपटातील ‘अभी मुझ मैं कही’ हे त्याचं गाणं आजही चाहत्यांना भावतं. याशिवाय ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘सूरज हुआ मद्धम ’ हे गाणं आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं.