भीषण अपघातानंतर प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; मैत्रिणीकडून आर्थिक मदतीची विनंती
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायर भीषण अपघातानंतर व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर अरुंधतीच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती तिच्या मैत्रिणीने केली आहे.
केरळ : 19 मार्च 2024 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायरचा केरळात अपघात झाला. 14 मार्च रोजी अरुंधती तिच्या भावासोबत कोवलम बायपास रोडवरून बाईकने जात होती. त्यावेळी दुसऱ्या गाडीची धडक लागून अरुंधतीचा अपघात झाला. या अपघातानंतर जवळपास तासभर अरुंधती आणि तिच्या भावाला कोणाची मदतच मिळाली नव्हती. सध्या दोघंही रुग्णालयात दाखल असून अरुंधतीची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. अरुंधतीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचं समजतंय. अरुंधती सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती तिची बहीण आरती नायरने दिली. आरतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित अरुंधतीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती चाहत्यांकडे केली.
‘तमिळनाडूच्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवण्यात आलेलं वृत्त खरं आहे. तीन दिवसांपूर्वी माझी बहीण अरुंधती नायरचा अपघात झाला होता. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. सध्या त्रिवंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे’, अशी पोस्ट बहीण आरती नायरने लिहिली होती.
View this post on Instagram
अरुंधतीची मैत्रीण आणि सहअभिनेत्री गोपिका अनिलनेही सोशल मीडियावर तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. अरुंधतीला आर्थिक मदतीची गरज असल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ‘माझी मैत्रीण अरुंधतीचा अपघात झाला असून त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. ती व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देतेय. रुग्णालयातील दररोजचा खर्च उचलणं खूप कठीण जात आहे. आम्ही आमच्या परीने मदत करतोय, पण तरी रुग्णालयाकडून होणाऱ्या मागण्यांच्या तुलनेत ते कमी आहे. मी तुम्हाला विनंती करते की शक्य तितकी मदत करा, जेणेकरून अरुंधतीच्या उपचारात कोणती अडचण येणार नाही’, असं लिहित तिने बँक खात्याची माहितीसुद्धा त्यात दिली आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, अरुंधती एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर घरी परतत होती. त्यावेळी ती तिच्या भावासोबत बाईकवर बसली होती. तेव्हाच दुसऱ्या गाडीची धडक लागून हा अपघात झाला. अरुंधतीने 2014 मध्ये ‘पोंगी एझू मनोहरा’ या तमिळ चित्रपटातून अभिनयविश्वात पदार्पण केलं. विजय अँटनीच्या ‘सैतान’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. 2018 मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘ओत्ताकोरू कामुकन’ या चित्रपटात तिने काम केलं होतं.