चेन्नई : साऊथ सुपरस्टार धनुषने चेन्नईमध्ये त्याच्या आईवडिलांसाठी एक आलिशान घर खरेदी केलं आहे. धनुषच्या फॅन क्लबचे अध्यक्ष आणि दिग्दर्शक सुब्रमण्यम शिवा यांनी फेसबुकवर या घराचे फोटो पोस्ट केले आहेत. या घरात धनुष त्याच्या आईवडिलांसोबतच राहणार असल्याचं कळतंय. चेन्नईमधल्या पोइस गार्डन परिसरातील या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये असल्याचं समजतंय. सुब्रमण्यम शिवा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये धनुषचे वडील कस्तुरीराजा आणि आई विजयलक्ष्मी पहायला मिळत आहेत. ‘माझा छोटा भाऊ धनुषचं नवीन घर मला जणू एखाद्या मंदिरासारखंच वाटतंय. त्याने त्याच्या आईवडिलांना स्वर्गासारखा घर दिला आहे’, अशा शब्दांत त्यांनी या घराचं वर्णन केलं आहे.
धनुषचा ‘वाती’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 20 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये धनुषसोबत संयुक्ता मेनन मुख्य भूमिकेत आहे. वेंकी अतलुरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जवळपास 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
एका रिपोर्टनुसार धनुषने 2012 मध्येही आईवडिलांना भेट म्हणून घर विकत घेऊन दिलं होतं. त्यावेळी त्याने जो बंगला खरेदी केला होता, त्याची किंमत 5 कोटी रुपये इतकी होती. माझ्या आईवडिलांसाठी सुंदर आणि आलिशान घर खरेदी करण्याचं माझं स्वप्न होतं, असं धनुष म्हणाला होता. आता 13 वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा आईवडिलांसाठी तब्बल 150 कोटी रुपयांचं आलिशान घर खरेदी केलं आहे.
धनुष केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 38 वर्षीय धनुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत 2004 मध्ये त्याने लग्न केलं. या दोघांना दोन मुलंही आहेत. पण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली होती.
धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरीराजा यांचा मुलगा आहे. तो अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.