तिरुपतीमध्ये मळक्या जुन्या कपड्यांमध्ये दिसला साऊथ सुपरस्टार; ओळखलंत का?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता तिरुपती मंदिराजवळ मळक्या, जुन्या कपड्यांमध्ये पहायला मिळाला. यावेळी त्याचा अवतार पाहून कोणीच त्याला ओळखू शकलं नव्हतं. या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिरुपती : 1 फेब्रुवारी 2024 | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिरुपतीमध्ये शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या ‘डीएनएस’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी धनुष तिरुपतीमध्ये होता. मात्र यावेळी त्याचा अवतार पाहून कोणीच त्याला ओळखू शकलं नाही. मळलेले जुने कपडे, वाढलेली दाढी अशा लूकमध्ये धनुषला ओळखणं कठीण आहे. मात्र या शूटिंगदरम्यान मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांना त्रास होत असल्याने अखेर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मंगळवारी धनुष अलीपिरी घाटवर चित्रपटाची शूटिंग करत होता. त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या वाहनांना पोलीस आणि बाऊन्सर्स दुसऱ्या मार्गाने वळवण्यास सांगत होते. यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं. दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांनी पोलिसांना प्रश्न विचारला की त्यांनी शूटिंगला अशा ठिकाणी परवानगी कशी दिली? अखेर याप्रकरणी एका भक्ताने पोलिसांत तक्रार केल्यानंतर शूटिंग थांबवण्यात आली. धनुषच्या या चित्रपटाची शूटिंग तिरुपतीमधील तलहटी याठिकाणी होणार होती. यामुळे बससह इतर वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार होतं. इतकंच नव्हे तर मंदिरात आलेल्या काही भक्तांनाही चित्रपटाच्या क्रू मेंबर्सने बाहेर पाठवल्याचं म्हटलं जात होतं. कारण टीमला गोविंदराजा स्वामी मंदिराच्या बाहेर शूटिंग करायची होती.
#D51 #Dhanush sir New Movie shooting #tirupati 💥 @dhanushkraja 😻 Sir pic.twitter.com/kZ70rAWAXf
— DhanushFC (@Dhanush1FC) January 31, 2024
पोलिसांनी शूटिंग थांबवली असली तरी टीमला ज्या भागाचं शूटिंग करायचं होतं, ते पूर्ण करण्यात यश आलं. शूटिंग संपल्यानंतर बुधवारी धनुष मंदिरात दर्शनासाठीही गेला होता. यावेळी त्याने पारंपरिक पांढरा पंचा आणि शॉल परिधान केला होता. धनुषच्या या चित्रपटात त्याच्यासोबत नागार्जुन आणि शेखर यांच्याही भूमिका आहेत. या तिघांच्या नावावरूनच चित्रपटाला ‘DNS’ असं नाव देण्यात आलं आहे. माफिया कथानकाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि जिम सर्भ यांच्याही भूमिका आहेत. अभिनेता धनुष केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
धनुषला दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. केवळ नायक म्हणून नाही तर अष्टपैलू कलाकार म्हणूनही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. धनुषचं पूर्ण नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. तो निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायकदेखील आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि अनेक पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत.