‘स्क्विड गेम’मधील अभिनेता लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांखाली आढळला दोषी; तुरुंगवासाची शिक्षा
नेटफ्लिक्सवरील 'स्क्विड गेम' या वेब सीरिजला जगभरातील प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये ओ-इल-नामची भूमिका साकारलेला अभिनेता ओ याँग सूला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिलेकडून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सुवॉन, दक्षिण कोरिया : 16 मार्च 2024 | ‘स्क्विड गेम’ या जगभरात गाजलेल्या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेला दक्षिण कोरियातील अभिनेता ओ याँग सू लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी आढळला आहे. ‘स्क्विड गेम’ या सीरिजमध्ये त्याने ओ-इल-नामची भूमिका साकारली होती. 2021 मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने जगभरातील तब्बल 100 दशलक्ष प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. या सीरिजमधील भूमिकेसाठी ओ याँग सूला नामांकित गोल्डन ग्लोब पुरस्कारदेखील मिळाला होता. या सीरिजनंतर एका महिलेनं त्याच्याविरोधात लैंगिक गैरवर्तनाची तक्रार केली होती. डिसेंबर 2021 मध्ये पीडित महिलेनं 79 वर्षीय ओ याँग सूविरोधात तक्रार दाखल केली होती. ओ याँग सूने आरोप फेटाळल्यानंतर याप्रकरणाचा पुन्हा तपास सुरू झाला. 15 मार्च 2004 रोजी सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या साँगनाम खंडपीठाने ओ याँ सूला दोषी ठरवल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.
महिलेकडून गंभीर आरोप
पोलीस तक्रारीनुसार, देगु इथल्या एका महिलेनं 2017 मध्ये ओ याँग सूवर चुकीचा स्पर्श आणि गालावर किस केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता ओ याँग सूला 40 तासांच्या लैंगिक हिंसाचार उपचार कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचसोबत आठ महिने तुरुंगवास आणि दोन वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा ठोठावण्यात आली होती. लैंगिक गैरवर्तणुकीच्या दोन आरोपांविरोधात अर्ज करण्यासाठी ओ याँग सूकडे एक आठवड्याची मुदत आहे.
निर्णयाविरोधात करणार अपील
दक्षिण कोरियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण सुनावणीदरम्यान ओ याँग सू मान खाली करून बसला होता. सुनावणीनंतर तो शांतपणे कोर्टाबाहेर पडला. या निकालाविरोधात तो अपील करणार असल्याचं कळतंय. ओ याँग सूवरील या आरोपांमुळे त्याला इतर प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं आहे. ‘वुमनलिंक’ या महिला हक्क गटाने ओ याँग सूविरोधातील न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.