SS Rajamouli: 16 वर्षांनंतर राजामौलींनी स्वीकारली ‘ती’ चूक; हृतिकबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण
विशेष म्हणजे राजामौलींनी त्यांची चूक स्वीकारत शब्दांची निवड चुकल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: ‘बाहुबली’, ‘RRR’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांची एकमेकांशी तुलना केल्याने राजामौलींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. “प्रभाससमोर हृतिक काहीच नाही” असं ते म्हणाले होते. आता याच वक्तव्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. विशेष म्हणजे राजामौलींनी त्यांची चूक स्वीकारत शब्दांची निवड चुकल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“मी खूप म्हणजे खूप आधी ते म्हटलं होतं. मला वाटतं जवळपास 15-16 वर्षांपूर्वी मी ते वक्तव्य केलं होतं. पण होय, माझ्या शब्दांची निवड चुकली होती, हे मी स्वीकारलं पाहिजे. त्याला कमी लेखण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. मी त्याचा खूप आदर करतो आणि त्या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत”, असं ते म्हणाले.
राजामौली नेमकं काय म्हणाले होते?
“दोन वर्षांपूर्वी जेव्हा धूम 2 प्रदर्शित झाला होता, तेव्हा मला वाटायचं की फक्त बॉलिवूडच असे चित्रपट का बनवू शकते? आपल्याकडे हृतिक रोशनसारखे हिरो नाहीत का? पण आता मी ‘बिल्ला’ या चित्रपटातील गाणं, पोस्टर आणि त्याचा ट्रेलर पाहिला. त्यानंतर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की प्रभाससमोर हृतिक रोशन काहीच नाही. दिग्दर्शक मेहेर रमेश मी यांचे आभार मानतो, कारण त्यांनी तेलुगू चित्रपटाला हॉलिवूडच्या पातळीवर नेलं आहे”, असं ते म्हणाले होते.
राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये प्रभासने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात दमदार कमाई केली होती. सध्या राजामौली हे त्यांच्या RRR या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.