‘किती पैसे मिळाले…’; मतदानानंतर सुबोध भावेनं लिहिलेल्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

| Updated on: Nov 20, 2024 | 1:25 PM

अभिनेता सुबोध भावेनं मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फलटणला शूटिंग सुरू असताना सुबोधने पुण्याला येऊन मतदान केलं. त्यानंतर तो पुन्हा शूटिंगसाठी रवाना झाला.

किती पैसे मिळाले...; मतदानानंतर सुबोध भावेनं लिहिलेल्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Subodh Bhave
Image Credit source: Instagram
Follow us on

गेले महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडतंय. त्यात 4136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. अनेक सेलिब्रिटींकडूनही मतदानासाठी आवाहन केलं जातंय. त्यासाठी अनेकांनी मतदान केल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केलंय. अशातच अभिनेता सुबोध भावेच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फलटणला शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही सुबोधने पुण्याला येऊन मतदान केलंय. मतदानानंतर त्याने फोटो पोस्ट करत ही पोस्ट लिहिली आहे.

सुबोध भावेची पोस्ट-

‘मी फलटणला शूट करतोय. काल रात्री उशिरा काम संपल्यावर पुण्यात पोहोचलो. आज सकाळी सगळ्यात लवकर जाऊन मतदान केलं आणि पुन्हा फलटणला शूटिंगसाठी पोहोचलो. (सांगायचा उद्देश मी किती भारी किंवा मतदान केलं म्हणजे काय उपकार केले का? किंवा किती पैसे मिळाले पोस्ट टाकायचे? अशा येणार्‍या उत्साहवर्धक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून…) आपल्या सर्वांना नम्र विनंती करण्यासाठी ही पोस्ट. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. न विसरता मतदान करा,’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

सेलिब्रिटींना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कोणत्या पोस्टवरून नेटकरी कधी निशाणा साधतील, त्याचा काही नेम नसतो. म्हणूनच अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून मतदारांना आवाहन करत असल्याचं सुबोधने आधीच स्पष्ट केलंय. सुबोधच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दादा राष्ट्रहित सर्वतोपरी, बाकी दुर्लक्ष करणेच योग्य,’ असं एकाने लिहिलं. तर ‘दादा तू ग्रेट आहेस. आपलं काम आणि सामाजिक जबाबदारी तितक्याच ताकदीने सांभाळत असतोस,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

राज्यातील 990 संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीवन पोलीस दलाच्या 500 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता. मतदान केंद्रांवर भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेच्या तुलनेत सुमारे दोन हजार मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.