प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटासाठी प्रिती झिंटाला ठरवलं होतं जबाबदार; आजही तिला केलं नाही माफ
नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्राने असंही सांगितलं की तिने आतापर्यंत प्रितीला माफ केलं नाही. "मला तिला माफ करायची गरज नाही. कारण माझ्यासाठी तिचं काही अस्तित्वच नाही. या गोष्टी माझ्यासाठी अस्तित्वात नाहीत."
मुंबई : अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूरसोबतचं घटस्फोट, लग्नातील समस्या यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्यामुळे शेखर कपूर आणि सुचित्रा यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याचसोबत याप्रकरणी बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीवर 2000 दशकाच्या सुरुवातीला सुचित्राने गंभीर आरोप केले होते. शेखर कपूरसोबतच्या अयशस्वी लग्नासाठी सुचित्राने या अभिनेत्रीला जबाबदार ठरवलं होतं. या अभिनेत्रीचं नाव आहे प्रिती झिंटा. आता नुकतंच सुचित्राने म्हटलंय की घटस्फोटाला 15 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी तिने अजूनही प्रितीला माफ केलं नाही. माझ्यासाठी प्रितीचं कोणतं अस्तित्वच नाही, असं ती म्हणाली.
सुचित्राने 1997 मध्ये शेखर कपूरशी लग्न केलं आणि 2006 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोट झाल्यानंतर सुचित्राने तिच्या एका ब्लॉगमध्ये कविता लिहिली होती. या कवितेत तिने म्हटलं होतं की, ‘शेखर कपूर आणि माझ्यात एक ‘आदमखोर’ (नरभक्षी) आली आणि तिने सर्वकाही उद्ध्वस्त केलं.’ या ब्लॉगमध्ये सुचित्राने कोणाचं नाव घेतलं नव्हतं पण त्यावेळी दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने प्रिती झिंटाच्या नावावर सहमती दर्शविली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर सुचित्राला प्रितीविषयी प्रश्न विचारण्यात आला.
View this post on Instagram
सुचित्राच्या आरोपांवर त्यावेळी दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रिती म्हणालेली, “मी नंबर वन अभिनेत्री आहे आणि तुम्ही कामसुद्धा करत नाही. तुम्ही गृहिणी आहात. सुचित्रा, माझ्याशी असं बोलू नका. तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्याची खूप गरज आहे. तुमचं डोकं ठिकाणावर नाही.” प्रितीच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुचित्रा म्हणाली, “आपलं स्वतंत्र विश्व आहे आणि त्यात ती तिच्या मर्जीनुसार काहीही करू शकते. मला गृहिणी असण्यावर खूप गर्व आहे. मी 20 वर्षे पूर्णपणे आईची जबाबदारी सांभाळली आणि त्यावर मला गर्व आहे. लोकांना काहीही म्हणायचं असतं आणि त्यांना ते म्हणण्याचा अधिकार आहे. खोटं बोलण्याला वेग असतो पण सत्यात सहनशक्ती असते.”
2007 मध्ये विक्की लालवानीसोबत दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा कृष्णमूर्तीने प्रिती झिंटाला आव्हान दिलं होतं. “जर मी चुकीची आहे असं तिला वाटत असेल तर तिने माझ्याविरोधात खटला दाखल करावा. तिला वाटेल ते ती करू शकते. जर तिला असं वाटत असेल की मी चुकीची आहे, तर तिने माझ्याविरोधात खटला दाखल करावा”, असं ती म्हणाली होती. नंतर अशाही चर्चा होत्या की प्रितीने सुचित्राला फोन करून तिची माफी मागितली होती. इतकंच नव्हे तर सुचित्रा आणि तिची मुलगी कावेरीला नंतर प्रितीने तिच्या ‘जान-ए-मन’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र सुचित्राने प्रीमिअरला जाणं टाळलं होतं.
नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्राने असंही सांगितलं की तिने आतापर्यंत प्रितीला माफ केलं नाही. “मला तिला माफ करायची गरज नाही. कारण माझ्यासाठी तिचं काही अस्तित्वच नाही. या गोष्टी माझ्यासाठी अस्तित्वात नाहीत.” प्रिती झिंटाने बॉयफ्रेंड जीन गुडइनफशी लग्न केलं आहे. 2021 मध्ये ती जुळ्या मुलांची आई झाली.