Sunny Deol: “अर्धवट सोडलं शूटिंग, पैसेही परत केले नाही”; सनी देओलवर दिग्दर्शकाकडून गंभीर आरोप
सनी देओलवर दिग्दर्शकाचा फसवणुकीचा आरोप; म्हणाले "त्याचा अहंकार.."
मुंबई: दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी पुन्हा एकदा अभिनेता सनी देओलवर टीका करत फसवणुकीचा आरोप केला आहे. 1996 मध्ये ‘अजय’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे दोघं कायदेशीर लढाई लढत आहेत. 25 वर्षांनंतरही सुनील दर्शन आणि सनी देओल यांच्यातील वाद मिटला नाही. सनी देओलला खूप जास्त अहंकार आहे, अशी टीका सुनील दर्शन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
1996 मध्ये सुनील दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला अजय हा चित्रपट प्रदर्शित झाला. सनीने मध्यातच चित्रपटातून काढता पाय घेतला आणि क्लायमॅक्स शूट करण्यास नकार दिला, असा आरोप सुनील यांनी केला. क्लायमॅक्सशिवायच चित्रपट प्रदर्शित केल्याचं त्यांनी सांगितलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ठीकठाक प्रतिसाद मिळाला, मात्र त्यानंतर सनी देओल आणि सुनील दर्शन यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली.
“सनी देओलला खूप अहंकार”
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाले, “सनी देओलला खूप अहंकार आहे. 26 वर्षांनंतरही माझा त्याच्याशी खटला अद्याप सुरूच आहे. आधी त्याने पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं. नंतर म्हणाला की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याऐवजी तो माझ्यासोबत चित्रपटात काम करेल. देशाचे निवृत्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती भरूचा यांच्यासमोर हा वाद सोडवण्यात आला होता. माझी रक्कम परत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून तो माझ्यासाठी चित्रपट करण्यास तयार झाला होता. मी त्याच्या भावासोबत (बॉबी देओल) लागोपाठ तीन चित्रपट केले. त्याच्याविरोधात माझा कोणताही राग नाही. चूक कोणीही सुधारू शकतो, असं मला वाटायचं. पण त्याने माझी फसवणूक केली.”
सनी देओलने सतत तारखा पुढे ढकलल्याचं सुनील म्हणाले. जेव्हा सुनील यांच्या वकीलाने सनीला नोटीस पाठवली तेव्हा त्याच्या लीगल टीमने उत्तर दिलं. सनीने अद्याप डायलॉग्सला संमती दिलं नसल्याचं स्पष्टीकरण लीगल टीमने दिलं. “मला त्याच्याकडून डायलॉग्सला संमती घेण्याची गरजच नव्हती. आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने डायलॉग्सला संमती दिली का? त्याचा हेतू चुकीचा होता. या सगळ्यात खूप पैसा आणि वेळ वाया गेला. हा वाद अजूनही सुरूच आहे”, असं सुनील म्हणाले.