अहमदाबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग विभागात या गाण्याने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारं ‘नाटू नाटू’ हे पहिलंच भारतीय गाणं ठरलं आहे. या विजयानंतर फक्त देशातच नाही तर जगातील विविध भागात नाटू नाटूवर डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले जात आहेत. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह सुनील गावस्कर यांनाही आवरला नाही. सध्या सोशल मीडियावर त्यांच्याही डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुनील गावस्कर यांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर या गाण्यावर डान्स केला. 73 वर्षीय गावस्कर यांचा उत्साह पाहून नेटकरीसुद्धा चकीत झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी पाचव्या दिवशी मॅच सुरू होण्यापूर्वी स्टेडियमवर ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला. यावेळी सूत्रसंचालक जतिन सप्रू आणि त्यांच्या साथीदारानेही स्टुडिओमध्ये या गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. यावेळी एक नव्हे तर दोन पुरस्कार भारताने आपल्या नावे केले. ए. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात पुरस्कार पटकावला. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या दोन्ही विजयानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करत दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी पारितोषिक स्वीकारलं. ‘कारपेंटर्स’ या अमेरिकन बँडची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, अशी माहिती किरवाणी यांनी पुरस्कार स्वीकारताना दिली. कारपेंटर्स बँडच्या ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ या गाण्याच्या चालीवर शब्द रचत त्यांनी पुरस्काराचा आनंद व्यक्त केला. या गाण्यावर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्म कऱण्यात आला. त्याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याविषयी सांगत असताना अख्खा प्रेक्षकवर्ग गाण्याचं कौतुक करताना दिसत होता.
दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी गौरविण्यात आलं. यापूर्वी गुनीत मोंगा यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘द लंचबॉक्स’, ‘मसान’, ‘पगलाइट’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.