“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बरंच काही सांगून गेली. गोविंदासोबतच्या नात्यात आता मला सुरक्षित वाटत नाही, असं सांगतानाच पुढच्या जन्मी नवरा म्हणून गोविंदा नको, असंही तिने म्हटलंय.
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. विविध मुद्द्यांवर किंवा कौटुंबिक प्रकरणांवर ती बेधडकपणे बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. गोविंदा आणि ती वेगवेगळ्या घरात राहत असल्याचंही तिने सांगितलंय. इतकंच नव्हे तर पुढच्या जन्मी मला गोविंदा पती म्हणून नकोय, असं तिने थेट म्हटलंय. सुनीताची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘हिंदी रश’ला दिलेल्या या मुलाखतीत सुनीताने गोविंदासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल असे काही खुलासे केले आहेत, ज्याची चाहत्यांनी कधी कल्पनासुद्धा केली नसेल. आमच्या नात्यात मला आता सुरक्षित वाटत नाही, असंही ती म्हणाली.
मुलांना अधिक वेळ देण्याकडे सुनीताचा कल असतो. तर गोविंदा नेहमी त्याच्या कामात व्यग्र असतो आणि मिटींग्सनंतर तो सहसा मित्रांसोबत वेळ घालवतो, असं तिने सांगितलं. “एकमेकांचं लाइफस्टाइल आणि आवडीनिवडी यांच्यात खूप फरक असल्याने वेळेनुसार आमच्यात भावनिक दुरावा निर्माण होत गेला. मला कुटुंबीयांसोबत निवांत आणि शांत वेळ घालवायला आवडतं. पण गोविंदाला मित्रमैत्रिणींसोबत तासनतास गप्पांमध्ये रमायला आवडतं. आम्ही एकमेकांसोबत फारसा रोमँटिक वेळही घालवला नाही. मला त्याच्यासोबत छोट्या-छोट्या गोष्टींचा अनुभव घ्यायचं असतं. उदाहरण द्यायचं झाल्यास, एकमेकांसोबत स्ट्रिट फूडचा आनंद घेणं, किंवा पुरेसा वेळ घालवणं.. यांसारख्या गोष्टी आवडतात. पण गोविंदाचं काम पाहता आम्हाला असे निवांत क्षण मिळालेच नाहीत. म्हणूनच मला माझ्या पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय”, असं सुनीता म्हणाली.
View this post on Instagram
याच मुलाखतीत सुनीता पुढे म्हणाली, “मला आधी आमच्या नात्यात खूप सुरक्षित वाटायचं. पण आता तितकं सुरक्षित वाटत नाही. वयाची साठी ओलांडली की लोकांचं डोकं फिरतं. गोविंदाचं वय साठच्या वर आहे आणि तो कधी काय करेल हे तुम्ही सांगू शकत नाही (हसते).” सुनीला आणि गोविंदाने 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं. या दोघांना टिना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे. गोविंदा त्याच्या पत्नीपासून वेगळ्या घरात राहतोय. त्याची पत्नी आणि मुलं एका अपार्टमेंटमध्ये राहतात. याच अपार्टमेंटच्या समोरील बंगल्यात गोविंदा राहतो. खुद्दा सुनीताने याबाबतचा खुलासा केला.