Sunny Deol | ‘गदर 2’च्या यशानंतर फी वाढवल्याच्या चर्चांवर सनी देओलने सोडलं मौन; म्हणाला “पैशांचा विषय..”
'गदर 2' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे विक्रम रचत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात तबब्ल 456.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘गदर 2’ने अत्यंत वेगाने कमाईचा 450 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या शर्यतीत सनी देओलने शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मागे टाकलं आहे. चित्रपटाच्या या अभूतपूर्व यशानंतर सनी देओलने त्याची फी वाढवल्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. या चर्चांवर आता खुद्द सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे. सनी देओल त्याच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा होती. स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानच्या एका ट्विटनंतर या चर्चांना उधाण आलं.
काय म्हणाला सनी देओल?
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मला असं वाटतं की पैशांचा विषय हा खूप खासगी असतो. एखादा पुरुष किंवा महिला किती कमावते याचा आकडा सहजरित्या कोणाला सांगत नाही. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींनाही कमाईचा आकडा सांगताना दहा वेळा विचार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे, मी किती फी घेणार आहे किंवा नाही हे जेव्हा मी माझा दुसरा चित्रपट साइन करेन, तेव्हाच स्पष्ट होऊ शकेल. सध्या तरी आम्ही गदर 2 ला मिळणाऱ्या यशाचा पुरेपूर आनंद घेत आहोत.”
“माझी किंमत मला माहीत आहे”
“मला माझी किंमत माहीत आहे. माझ्या पडत्या काळातही मी मानधनाशी तडजोड केली नव्हती. पण त्याचवेळी मी एक समजूतदार व्यक्ती आहे. मला माहितीये की आज सनी देओलला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. मात्र मी तर तिथेच आहे, जिथे आधी होतो. फक्त लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्यासाठी माझं कुटुंब हीच सर्वांत मोठी संपत्ती आहे. अजून काय पाहिजे?”, असं तो पुढे म्हणाला.
‘गदर 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सनी देओलला बऱ्याच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर एवढं मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलं की, “प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सनीला अश्रू अनावर झाले होते. मी त्याला पहिल्यांदा रडताना ऐकलं होतं. तो म्हणाला, शर्माजी.. आपण करून दाखवलं. सनी देओलला फोनवर रडताना ऐकून माझे आणि माझ्या पत्नीचेही डोळे पाणावले होते. तो क्षण खूप भावनिक होता.”