Gadar 2 | ‘जवान’च्या आधी सनी देओलला करायचंय हे मोठं काम पूर्ण; मतभेद मिटले तरी वैर कायम
गेल्या तीन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर फक्त 'गदर 2'चीच चर्चा आहे. मात्र आता येत्या 7 सप्टेंबरला शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सनी देओलच्या चित्रपटाकडे नवा विक्रम रचण्यासाठी मोठी संधी आहे.
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘तारा सिंग’चीच कमाल पहायला मिळतेय. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने तिसऱ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई केली आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर आता सनी देओलचा ‘गदर 2’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. आता शाहरुखच्याच दुसऱ्या चित्रपटाआधी ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. तारा सिंगसमोर ही मोठी संधी आहे. ‘जवान’ प्रदर्शित होण्याआधी ‘गदर 2’कडून कमाईचा 500 कोटींचा पार केला जाऊ शकतो.
नवा विक्रम रचण्यापासून ‘गदर 2’ काही पावलं दूर
प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच या वीकेंडला ‘गदर 2’कडून नवा विक्रम रचला जाऊ शकतो. याआधी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनच्या सुट्टीचा या चित्रपटाला चांगला फायदा मिळाला होता. आता शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ‘गदर 2’कडे कमाईची चांगली संधी आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 22 व्या दिवशीही समाधानकारक कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी ‘गदर 2’ने 4.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे देशभरातील आतापर्यंतच्या कमाईचा आकडा 486.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 613.8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
‘जवान’च्या आधी ‘गदर 2’कडे बंपर संधी
येत्या 7 सप्टेंबर रोजी शाहरुखचा ‘जवान’ प्रदर्शित होण्याआधी सनी देओलच्या ‘गदर 2’कडे 500 कोटींचा टप्पा पार करण्याची चांगली संधी आहे. शाहरुखच्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. त्याच्या टीझर आणि ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा झाली आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरनंतर ‘गदर 2’च्या कमाईला ब्रेक लागू शकतो.
सनी देओल-शाहरुखचं वैर
शाहरुख खान आणि सनी देओल यांच्यात ‘डर’ चित्रपटापासून काही मतभेद होते. बरीच वर्षे हे दोघं एकमेकांशी बोलतसुद्धा नव्हते. काही मुलाखतींमध्ये सनी देओलने शाहरुखला टोमणा मारला होता. आता ‘गदर 2’च्या निमित्ताने दोघं पुन्हा बोलू लागले आहेत. यांच्यातील मतभेद जरी मिटले असले तरी बॉक्स ऑफिसवरील वैर कायमच आहे. आधी सनी देओलच्या ‘गदर 2’ने विसाव्या दिवसाच्या कमाईत शाहरुखच्या ‘पठाण’ला मागे टाकलं होतं. आता ‘जवान’ प्रदर्शित होण्यापूर्वी तो नवा विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे.