ते सीन मला अजिबात आवडले नाहीत पण..; ‘ॲनिमल’ पाहिल्यानंतर सनी देओलची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 15, 2023 | 10:27 AM

‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

ते सीन मला अजिबात आवडले नाहीत पण..; ॲनिमल पाहिल्यानंतर सनी देओलची प्रतिक्रिया
Sunny Deol and Bobby Deol
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 15 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 750 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. या चित्रपटावर सर्वसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉबी देओलचा भाऊ सनी देओलने ‘ॲनिमल’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातील काही सीन्स आवडलं नसल्याचं सनीने स्पष्ट म्हटलंय.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, “मी खरंच बॉबीसाठी खूप खुश आहे. मी त्याचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला आणि तो मला आवडला. हा एक चांगला चित्रपट आहे. पण त्यातील काही गोष्टी मला आवडल्या नाहीत, ज्या मला माझ्या चित्रपटांसहित इतरही अनेक चित्रपटांमध्ये आवडल्या नाहीत. एक व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून मला त्या गोष्टी आवडण्याचा किंवा न आवडण्याचा अधिकार आहे. पण एकंदर पाहता ‘ॲनिमल’ हा चांगला चित्रपट आहे. त्यातील संगीत खूप चांगलं आहे आणि सीनसोबत ते उत्तमरित्या जमलंय. बॉबी तर नेहमीपासून बॉबी राहिला आहे, पण आता या चित्रपटानंतर तो लॉर्ड बॉबी ठरला आहे.”

हे सुद्धा वाचा

‘ॲनिमल’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या 14 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली कमाई सुरू आहे. देशभरात हा चित्रपट कमाईचा 500 कोटींचा आकडा लवकरच गाठणार आहे. तर जगभरात ‘ॲनिमल’ने तब्बल 772 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 800 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार आहे. ‘ॲनिमल’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी जगभरात तगडी कमाई करत पहिलं आणि दुसरं स्थान पटकावलं आहे.

बॉबीने चित्रपटात अबरार हक ही खलनायकी भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याला एकही डायलॉग नसताना आणि मर्यादित स्क्रीन टाइम असतानाही बॉबीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे.