‘सूर नवा ध्यास नवा’चा महाअंतिम सोहळा; वर्षाचं समापन होणार आणखी धमाकेदार

| Updated on: Dec 29, 2023 | 1:55 PM

महाराष्ट्रातील सूरवीरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात ‘सूर नवा ध्यास नवा’चा रंगमंच सज्ज झाला. कलर्स मराठी वाहिनीवर गाण्यांची मैफल पुन्हा एकदा सजली. सुरांशी पुन्हा मैत्री करत संगीताचा सुरेल नजराणा महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अनुभवला. आता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा; वर्षाचं समापन होणार आणखी धमाकेदार
'सूर नवा ध्यास नवा'चा महाअंतिम सोहळा
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम सहा जण अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या शोचा महाअंतिम सोहळा हा सर्वोत्तम सहा स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

हा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसणार आहे. तर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच भव्यदिव्य होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 डिसेंबर रोजी ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ ग्रँड फिनाले पार पडणार आहे, रविवारी 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.

हे सुद्धा वाचा

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील करतेय. तर महेश काळे, अवधूत गुप्ते हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. 7 ऑक्टोबरपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण सिझनमध्ये जुनी गाणी नव्या रुपात सादर केली गेली. प्रत्येक गाण्यात प्रेक्षकांना नाविन्य पहायला मिळालं. तरुण पिढीने केलेला हा प्रयत्न परीक्षकांसोबत प्रेक्षकांनाही खूप आवडला. या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सलाही राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. एकूण 12 सूरवीर या ऑडिशन्समधून निवडण्यात आले होते. त्यापैकी आता सहा जण अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या सहा जणांपैकी महाविजेता कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.