त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर..; सलमानविरोधात गेल्यानंतर विवेकच्या संघर्षाविषयी सुरेश ओबेरॉय व्यक्त
विवेक आणि ऐश्वर्या यांचं 2005 मध्ये ब्रेकअप झालं. ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात सलमान खान याने धमकी दिल्याचा खुलासा त्याने नंतर केला होता. इतकंच नव्हे तर सलमानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप विवेकने केला होता.
अभिनेता विवेक ओबेरॉयने 2002 मध्ये राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय हे मुलाच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. विवेकला अभिनेता म्हणून फिल्म इंडस्ट्रीत लाँच करणं हे जणू दुसऱ्या संघर्षासारखंच होतं, अस ते म्हणाले. सुरेश यांनी सांगितलं ते मुलाला लाँच करण्यासाठी निर्मात्यांच्या कार्यालयाबाहेर विवेकचा फोटो हातात घेऊन बसायचे.
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुरेश यांना विचारण्यात आलं की जेव्हा विवेकने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यावर ते म्हणाले, “मी त्याला त्याच्या लहानपणापासूनच तयार केलंय. मी त्याला नाटकांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा दिली, अभिनयाच्या क्लासेसना पाठवलं आणि FTII मधील माझ्या सीनिअरसोबत कोर्स करायला लावलं. विवेकसाठी मी नेहमीच संघर्ष करायला तयार आहे. मी निर्मात्यांच्या ऑफिसबाहेर विवेकचे फोटो हातात घेऊन बसायचो. राम गोपाल वर्मा आणि इतर अनेकांच्या ऑफिसबाहेर मी बसलोय. माझ्यासाठी तो दुसरा संघर्ष होता. अखेर रामूने (राम गोपाल वर्मा) त्याला संधी दिली.”
View this post on Instagram
दुसरीकडे ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत विवेकने सांगितलं की त्याने पहिली भूमिका मिळवण्यासाठी दुसऱ्या नावाचा वापर केला होता. सुरेश ओबेरॉय यांचा मी मुलगा आहे, असं सांगणं टाळल्याचं विवेकने स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर ‘कंपनी’ या चित्रपटासाठी साइन करण्याआधी राम गोपाल वर्मा यांना विवेक हा सुरेश ओबेरॉय यांचाच मुलगा असल्याचं माहित नव्हतं, असंही त्याने सांगितलं. याविषयी विवेक म्हणाला, “मी कोणालाच हे सांगितलं नव्हतं की मी सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. कारण मला माझ्या वडिलांना लाज वाटेल, असं काही करायचं नव्हतं. तसंच मला इंडस्ट्रीत या चर्चासुद्धा टाळायच्या होत्या की सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा प्रत्येक ऑफिसबाहेर असा फिरतोय. म्हणून मी माझं नाव विवेक आनंद असं सांगून प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला.”
याच मुलाखतीत सुरेश यांना विवेकच्या करिअरमधील कठीण काळाविषयी प्रश्न विचारण्यात आला. अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करू लागल्यानंतर विवेकच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर त्याने एकेदिवशी थेट पत्रकार परिषद घेत ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सलमान खानवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर विवेकचं करिअर पूर्णपणे पालटलं होतं. त्याला काम मिळणं बंद झालं होतं. याविषयी बोलताना सुरेश म्हणाले, “यातून बाहेर पडण्यात त्यानेच संपूर्ण ताकद लावली होती. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो व्यसनाधीन किंवा ड्रग्जच्या आहारी गेला असता. अनेक लोक त्याच्या विरोधात होते. मीडिया, फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि अभिनेतेसुद्धा.. कधी कधी जेव्हा एखाद्याला पटकन यश मिळतं, तेव्हा इतरांना ते सहन होत नाही.”