‘ॲनिमल’च्या शूटिंगदरम्यान सुरेश ओबेरॉय यांनी थेट नीतू कपूर यांना मेसेज केला, ‘तुमच्या मुलाला संस्कार..’
'ॲनिमल' या चित्रपटात अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. चित्रपटात ते रणबीर कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.
मुंबई : 18 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटात अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी रणबीर कपूरच्या आजोबांची भूमिका साकारली. या चित्रपटाने देशभरात कमाईचा 500 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांचा पार केला आहे. ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, बॉबी देओल यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरेश ओबेरॉय यांनी रणबीरसोबत चित्रपटात काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयी सांगितलं. रणबीरसोबत काम केल्यानंतर त्यांनी त्याची आई नीतू कपूर यांना एक खास मेसेज केला होता. हा मेसेज काय होता, त्याचाही खुलासा सुरेश यांनी केला.
‘लेहरें रेट्रो’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय यांनी रणबीरच्या स्वभावाचं तोंडभरून कौतुक केलं. त्याचप्रमाणे तो अभिनेता म्हणूनही उत्कृष्ट असल्याची प्रशंसा त्यांनी केली. “रणबीर एक माणूस म्हणूनही खूप चांगला आहे आणि अभिनेता म्हणून त्याहूनही उत्तम आहे. सेटवर सर्वांशी कसं वागायचं, हे त्याला बरोबर माहीत आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी त्यांची जडणघडण उत्तमरित्या केली आहे. त्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. मी नीतू यांना मेसेजसुद्धा केला होता की, तुम्ही तुमच्या मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत”, असं त्यांनी सांगितलं. एक व्यक्ती म्हणून कोणाशी कसं वागायचं, याची योग्य जाण रणबीरला असल्याचं सुरेश यांनी म्हटलं.
View this post on Instagram
‘ॲनिमल’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले अभिनेते शक्ती कपूर यांनीसुद्धा याआधी रणबीरच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “तो इंडस्ट्रीमधल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. मुलाचं हे यश पाहण्यासाठी आज ऋषी कपूर या जगात असायला पाहिजे होते.”
‘ॲनिमल’मधील भूमिकेसाठी रणबीरने खूप मेहनत घेतली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिला होता. मुलगी आणि पत्नीला रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणबीर लगेचच शूटिंगला परतला होता. अभिनेता के. पी. सिंगने याचा खुलासा केला होता. सकाळी 11 वाजता राहा आणि आलियाचा डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता तो सेटवर परतला होता, असं त्याने सांगितलं.