“आईवडिलांच्या घटस्फोटानंतर शाळेत जायलाही लाज..”; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून भावना व्यक्त
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. प्रतिष्ठित कुटुंब असल्याने वर्तमानपत्रात त्यांच्या घटस्फोटाच्या खटल्याच्या बातम्या सतत छापल्या जायच्या.
![आईवडिलांच्या घटस्फोटानंतर शाळेत जायलाही लाज..; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून भावना व्यक्त आईवडिलांच्या घटस्फोटानंतर शाळेत जायलाही लाज..; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून भावना व्यक्त](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Veer-Pahariya-with-mother.jpg?w=1280)
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. वीर हा मोठे उद्योजक संजय पहाडिया आणि स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वीर त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. प्रतिष्ठित कुटुंब असल्याने वीरच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची बातमी माध्यमांमध्ये बरीच चर्चेत होती. त्यामुळे याचा मनावर खोलवर परिणाम झाल्याचं वीरने सांगितलं.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वीर म्हणाला, “पालकांचं विभक्त होणं कोणत्याच मुलांसाठी चांगलं नसतं. त्यावेळी सोशल मीडिया किंवा दुसरी कोणतीही गोष्ट नव्हती, ज्यामुळे मी परिस्थितीला समजू शकेन. त्यामुळे अत्यंत विचित्र परिस्थितीत मी लहानाचा मोठा झालो. वर्तमानपत्रात त्यांच्या खटल्याबद्दल सतत बातम्या छापल्या जात होत्या आणि इंटरनेटवर सर्वकाही उपलब्ध होतं. मला शाळेत जायलाही लाज वाटू लागली होती. त्यामुळे माझे फार मित्रही नव्हते. मी लोकांपासून लांबच राहिलो. लहानपणी माझ्यात आत्मविश्वासच नव्हता. असं कोणासोबत घडू नये.”
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Muktai.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Kabir-Khan-on-Mahakumbh-2025.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Hema-Malini.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Vicky-Kaushal.jpg)
घरातील परिस्थिती आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम पाहता वीरने थेरपीचा आधार घेण्याचा निर्णय घेतला होता. “मला वाटतं की आयुष्यात आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या धक्क्यातून जात असतो. त्याबद्दल कोणाकडे तरी व्यक्त होणं गरजेचं असतं. मला थेरपी आणि अभिनयाच्या वर्कशॉप्सची खूप मदत झाली. प्रेम आणि लग्न यावरून माझा विश्वास अजून तरी उडालेला नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
या मुलाखतीत वीर त्याच्या वडिलांविषयी म्हणाला, “मी माझ्या वडिलांना फार भेटत नव्हतो. पण आता आमच्यातही जवळीक निर्माण झाली आहे. घटस्फोट झाला तरी माझ्या पालकांनी आई-वडिलांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती. ते पती-पत्नी म्हणून चांगले नव्हते पण आई-वडील म्हणून खूप चांगले आहेत. मला त्यांची कमतरता कधीच जाणवली नाही.”
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वीर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. अभिनेत्री सारा अली खानसोबत त्याच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. तर वीरचा भाऊ शिखर पहाडिया हा अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात साराने वीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 75 कोटी रुपये कमावले असून प्रेक्षक-समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतोय.