सुष्मिता सेनला हार्ट अटॅक आल्याचं कळताच अशी होती एक्स बॉयफ्रेंडची अवस्था; स्वत: केला खुलासा
अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या वर्षा हार्ट अटॅक आला होता. तिच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या वर्षी मार्च महिन्यात हृदयविकाराचा झटका आला. खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर तिचे प्राण वाचले होते. सुष्मिताच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर तिच्यावर अँजियोप्लास्टी झाली आणि स्टेंट्ससुद्धा लागले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल या संपूर्ण घटनेवर मोकळेपणे व्यक्त झाला आहे. सुष्मिता आणि रोहमन यांनी 2021 मध्ये ब्रेकअप जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही दोघांमधील मैत्री आजतागायत कायम आहे. “सुष्मिताच्या हार्ट अटॅकविषयी जाणून सुरुवातीला मी सुन्न झालो होतो, पण ती त्यातून खूप चांगल्याप्रकारे सावरल्याने मलाही धीर मिळाला,” असं रोहमनने सांगितलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोहमन म्हणाला, “जेव्हा अशी एखादी गोष्ट घडते, तेव्हा तुम्ही फक्त सुन्न पडता. कारण कोणत्या गोष्टीचा आघात तुमच्यावर झाला ते समजत नाही. पण त्या परिस्थितीतून जी व्यक्ती जात आहे, तेसुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. कारण ती व्यक्ती कसा सामना करतेय, यावर सगळं काही अवलंबून असतं आणि सुष्मिताने सर्वकाही गोष्टींचा खूप धाडसाने सामना केला. इतकी मोठी गोष्ट घडली आहे, याची आम्हाला तिने जाणीवसुद्धा होऊ दिली नाही. हेच त्या व्यक्तीचं खरं सौंदर्य आहे. या घटनेआधी मी माझ्या आरोग्याकडे फार गांभीर्याने कधी पाहिलं नव्हतं. मात्र सुष्मिताच्या हार्ट अटॅकने सर्वकाही बदललं. मी स्वत:चं आणि माझ्या कुटुंबीयांचंही रेग्युलर चेकअप करू लागलो. मी आता आरोग्याला प्राधान्य द्यायला शिकलोय.”
View this post on Instagram
या घटनेनंतर सुष्मिताच्या मुली रेनी आणि अलिशासोबतचं त्याचं नातं अधिक घट्ट झालं का, असा प्रश्न विचारल्यावर रोहमन पुढे म्हणाला, “अर्थातच.. दोन्ही मुली नेहमीच माझ्या संपर्कात असतात आणि माझ्याने जेवढं शक्य होतं तेवढ मी करतो. पण मला असं वाटत नाही की मी काही वेगळं करतो. पण सुष्मिताच्या मुली खूप चांगल्या आहेत. मी स्वत:ला नशिबवान मानतो, की मला असं नातं अनुभवायला मिळतंय. अशा नात्यामुळे तुम्ही स्वत: आणखी चांगली व्यक्ती बनता.”
हार्ट अटॅकनंतर दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती, “आयुष्यातील तो एक टप्पा होता आणि तो मी पार केला आहे. मी खूप नशिबवान आहे की त्या टप्प्याला पार करून मी पुढे येऊ शकले. पण आता मला आजारपणाची भिती वाटत नाही. उलट आता मी आयुष्याकडे आणखी सकारात्मकतेने पाहते. जेव्हा तुम्हाला नव्यानं आयुष्य मिळतं, तेव्हा तुम्ही त्याचा आणखी आदर आणि काळजी करता.”