Sushmita Sen | सुश्मिता सेनच्या हार्ट अटॅकच्या वृत्ताने बॉलिवूड चिंतेत; तब्बूपासून शिल्पा शेट्टीपर्यंत या सेलिब्रिटींकडून काळजी व्यक्त
अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदय विकाराचा झटका आला होता. तिच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. एका पोस्टद्वारे सुष्मिताने सर्वांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
मुंबई : अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या इंडस्ट्रीत सक्रिय नाही. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतीस तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. सुश्मिताची ही पोस्ट वाचून सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आश्चर्याचा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सुश्मिताने या पोस्टमधून दिली. सुदैवाने आता तिची प्रकृती ठीक आहे. मात्र तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला, या वृत्तानेच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी चिंतेत आहेत.
सुश्मिताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण तिच्या हिंमतीची दाद देत आहे. त्याचसोबत तिला आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. ‘खूप सारं प्रेम सुपर गर्ल’, असं अभिनेत्री तब्बूने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.
काय आहे सुश्मिताची पोस्ट-
‘काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता, अँजियोप्लास्टी झाली, स्टेंट लागले आणि सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे माझ्या कार्डिओलॉजिस्टने मला सांगितलं की माझं हृदय खूप मोठं आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली होती. त्यावर कमेंट करत अभिनेत्री पूनम ढिल्लनने लिहिलं, ‘निरोगी राहा, स्वस्थ राहा, तू एक अद्भुत महिला आहेस. देव तुला नेहमी चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद देवो.’ ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानने लिहिलं, ‘तुमच्यासाठी खूप सारं प्रेम आणि ताकद पाठवतेय.’
View this post on Instagram
सोफी चौधरीने सुश्मिताच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ‘ओह माय गॉड.. तुला भरपूर प्रेम.. मला माहित आहे की तुझं हृदय आता आधीपेक्षा अधिक मजबूत झालं असेल.’ तर शिल्पा शेट्टीनेही सुश्मिताच्या आरोग्यासाठी काळजी व्यक्त केली. ‘तू खूप मौल्यवान आहेस. लवकरच ठीक होशील’, असं गौहर खानने म्हटलंय. याशिवाय दिव्या अग्रवाल आणि मुनमुन दत्ता यांनीसुद्धा कमेंट करत सुश्मिताच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली.
सुश्मिता सेनची पोस्ट-
‘तुमच्या हृदयाला आनंदी आणि धैर्यवान ठेवा, तुम्हाला जेव्हा सर्वाधिक त्याची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासोबत असेल (माझ्या वडिलांचे मोलाचे शब्द). काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला, अँजियोप्लास्टी झाली, स्टेंट लागले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्डिओलॉजिस्टने मला सांगितलं की माझं हृदय खूप मोठं आहे. अनेक जणांचे मला आभार मानायचे आहेत. त्यासाठी मी दुसरी पोस्ट लिहीन. ही पोस्ट मी माझ्या शुभचिंतकांना आणि जवळच्या व्यक्तींना हे सांगण्यासाठी लिहितेय की आता सर्वकाही ठीक आहे, माझी प्रकृतीही ठीक आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.