मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : ‘स्वदेस’मध्ये झळकलेली अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांच्या गाडीचा इटलीत भीषण अपघात झाला. या अपघातात गायत्री आणि तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली नसून दुसऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचं निधन झालं आहे. इटलीतील सार्डिनिया याठिकाणी दोन ते तीन कारची एकमेकांना धडक झाली. त्यापैकी एक कार गायत्रीची होती. तर फरारीमधून प्रवास करणाऱ्या स्विस दाम्पत्याचं या भीषण अपघातात निधन झालं. या अपघातामुळे गायत्री जोशी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केलं. मात्र या पहिल्या चित्रपटानंतर गायत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाली.
गायत्रीचा जन्म 1977 मध्ये नागपुरात झाला. तिने मुंबईत कॉलेजमध्ये शिकताना मॉडेलिंगला सुरुवात केली होती. गोदरेज, एलजी, पाँड्स, बॉम्बे डाईंग, सनसिल्क आणि फिलिप्स अशा नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तिने काम केलं. तिने हुंडाईच्या जाहिरातीत पहिल्यांदा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केला होता. 1999 मध्ये गायत्रीने ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती पाच फायनलिस्टपैकी एक होती. त्याच्या पुढच्या वर्षी तिला मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब मिळाला. तिने जपानमध्ये मिस इंटरनॅशनल 2000 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
2004 मध्ये गायत्रीने आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. गायत्रीच्या अभिनयाची त्यांनी प्रशंसा केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते. मात्र त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम केल्यानंतर गायत्रीने भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीशी लग्न केलं.
स्वदेस हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही महिन्यांतच गायत्रीने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे प्रवर्तक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीत काम करणं सोडून दिलं. विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ही जवळपास 22,780 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत असलेल्या 100 जणांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. गायत्रीने लग्नानंतर वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलंय.