ह्याचसाठी केला होता अट्टाहास… म्हणत स्वप्निल जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन
स्वप्निल जोशीने अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. या दर्शनाचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्वप्निलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर त्याने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. ह्याच साठी केला होता अट्टहास असं म्हणत स्वप्निलने भावनिक पोस्ट लिहिली आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी कलाविश्वातील अनेक कलाकार त्याठिकाणी उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नसला तरी ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं त्याने ठरवलं होतं. रामलल्लाच्या दर्शनापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्याचा छोटा व्लॉग स्वप्निने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
स्वप्निल जोशीची पोस्ट-
’22 जानेवारी 2024 हा दिवस माझ्यासाठी/ सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामांचं अयोध्या नगरीमधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही. पण एक मात्र ठरवलं होतं, ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं! काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला आणि सोबत होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं,’ असं त्याने लिहिलं.
प्रभुंचं दर्शन, सरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता.. सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी ‘ह्याच साठी केला होता अट्टहास’ असं वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना. जय श्री राम,’ अशा शब्दांत स्वप्नीलने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
स्वप्निलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘वाह खूप छान, तुझ्यामुळे पुन्हा दर्शन झालं’, असं एकाने लिहिलं. तर ‘साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्रांच्या भेटीस’, असं दुसऱ्याने म्हटलंय. स्वप्निलच्या या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
यंदाच्या वर्षी स्वप्निलने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आगामी काळात तो विविध प्रोजेक्ट्सद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या त्याच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. 2004 मध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तब्बल 20 वर्षांनंतर त्याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.