‘मुस्लीम आहेत म्हणून..’; संभलच्या हिंसाचारावर स्वरा भास्करची संतप्त पोस्ट
उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून अभिनेत्री स्वरा भास्करने तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने न्यायव्यवस्थेवरही निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशातील संभल इथं एका मुघलकालीन मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं. जमाव आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये किमान तिघांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील संभल इथल्या मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या जागेवर आधी हरिहर मंदिर असल्याचा दावा करणारी एक याचिका स्थानिक न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सर्वेक्षण करण्यात आलं. तेव्हापासून या भागात तणाव वाढला होता. रविवारी सकाळी मोठा जमाव मशिदीच्या बाहेर जमला. निदर्शकांनी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करचं ट्विट चर्चेत आलं आहे.
स्वरा नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि बिनधास्तपणे मतं मांडण्यासाठी चर्चेत असते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर तिने मांडलेली मतं नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असतात. आता संभलमधल्या घटनेवर तिने एक पोस्ट लिहिली आहे. ‘आपण सध्या भारतात अशा टप्प्यावर आहोत जिथे नागरिक मुस्लिम आहेत म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणारे त्यांची हत्या करत आहेत. आणि न्यायव्यवस्था? ते कदाचित त्यांचं काम कसं करावं याबद्दल देवाकडून सल्ले घेत आहेत. अत्यंत मूर्खपणा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने संभलचा हॅशटॅगसुद्धा दिला आहे.
We are at that point in India where law enforcement is murdering citizens because they are Muslims. And the judiciary ?? They are probably seeking advise from God about how to do their job. Absolute shitshow. #Sambhal
— Swara Bhasker (@ReallySwara) November 26, 2024
संभलमधील हिंसाचारप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. त्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. एकीकडे इंडिया आघाडी राज्यात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवीन कोहली यांनी केला. तर हा हिंसाचार म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुनियोजित कट असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे. पोटनिवडणुकांमध्ये करण्यात आलेल्या गैरप्रकारांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी सत्ताधारी पक्ष, सरकार आणि प्रशासनाने संभलमधील हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला.