नवऱ्याने होळी का साजरी केली नाही? विचारणाऱ्यांना स्वरा भास्करचं सडेतोड उत्तर
तुझ्या नवऱ्याने होळी का नाही खेळली, असा प्रश्न विचारणाऱ्यांना अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर दिलं आहे. स्वराने रंगपंचमीच्या दिवशी पती आणि मुलासोबतचा फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यावरून काहींनी तिला ट्रोल केलं होतं.

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून विविध मुद्द्यांवर तिची मतं मोकळेपणे मांडत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकताच तिने होळीनिमित्त इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. पती आणि मुलासोबतचा हा तिचा फोटो होता. या फोटोमध्ये फक्त स्वरा आणि मुलीच्या चेहऱ्यावर रंग पहायला मिळाले. स्वराचा पती फहाद अहमदने होळी खेळली नव्हती. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. त्याच ट्रोलर्सना आता स्वराने प्रत्युत्तर दिलं आहे.
शुक्रवारी स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला. कुटुंबीयांसोबतचा फोटो पोस्ट करत तिने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये स्वरा भास्कर, तिचा पती फहाद अहमद आणि मुलगी राबिया हे तिघं एकत्र पहायला मिळाले. यावेळी स्वरा आणि राबियाच्या चेहऱ्यावर होळीचे रंग स्पष्ट दिसले. परंतु फहादच्या चेहऱ्यावर कुठलाच रंग नव्हता. रमजाननिमित्त रोझा करत असल्याने त्याने होळी खेळली नसल्याचा अंदाज काहींनी वर्तवला. मात्र त्यावरून काहींनी जोरदार ट्रोलसुद्धा केलं.




‘तुझ्या पतीने धुळवड का साजरी केली नाही’, असा सवाल एकाने केला. तर ‘अंधभक्ताचा प्रश्न: तुझ्या पतीने रंग का लावले नाहीत’, असं दुसऱ्याने विचारलं. ‘तुझ्या नवऱ्याने होळी खेळली नाही, यातूनच सर्वकाही दिसून येतंय’, असं तिसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘जर तुम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करत असाल तर एकमेकांच्या सण-उत्सवात तुम्ही आनंदाने सहभागी होता. पण सण-उत्सवातील हा सहभाग फक्त एकाच बाजूने होत असेल तर ती समस्या आहे’, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे.
View this post on Instagram
या ट्रोलिंगवर स्वरानेही लगेच उत्तर दिलं, ‘हॅपी होळी. एक आठवण करून देते की लोकांना त्यांच्या सहभागासाठी बळजबरी न करताही आपले आपले सण-उत्सव साजरे करणं आणि आनंद पसरवणं शक्य आहे. ‘
स्वराने राजकीय नेता फहाद अहमदशी फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केलं. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात तिने मुलगी राबियाला जन्म दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) जाण्यापूर्वी फहाद हा समाजवादी पक्षाचा सदस्य होता. त्याने 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईतील अणुशक्ती नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वरा लग्नानंतर कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. 2022 मध्ये तिचे ‘जहाँ चार यार’ आणि ‘मिमांसा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.