मुंबई : आपल्या ट्विट्समुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने अचानक तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 8 जानेवारी रोजी स्वराने तिच्या ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो पोस्ट केला होता. ‘हे प्रेम असू शकतं’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं आणि आता त्याच्याचसोबत स्वराने लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करच्या आयुष्यातील हा मिस्ट्री मॅन दुसरा तिसरा कोणी नसून समाजवादी युवजन सभेचा प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद आहे. 16 फेब्रुवारी रोजी या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या दोघांची भेट नेमकी कशी झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांच्या मनात घोंघावत आहेत.
स्वरा भास्कर नेहमीच विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर बेधडकपणे व्यक्त झाली. कधी ट्विट्सच्या माध्यमातून तर कधी आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन तिने सर्वांचं लक्ष वेधलं. 2019 च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तिने तीव्र विरोध केला होता आणि त्यावेळी तिने रॅलींमध्येही भाग घेतला होता. अशाच एका निषेधादरम्यान तिची फहाद अहमदशी भेट झाली. त्यावेळी तो विद्यार्थी नेता होता. स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. यातच तिने फहादसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा एका रॅलीमधलाच आहे.
2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्यावेळी तो सरचिटणीस होता आणि तो संप जवळपास 300 दिवस चालला होता. फहाद अहमद तेव्हा एमफील (MPhil) शिकत होता.
इतकंच नव्हे तर त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षांकडून त्याने दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्यासही नकार दिला होता. त्याला पीएचडी प्रोग्रामसाठीची नोंदणीही नाकारण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता तो त्याच संस्थेतून पीएचडी करत आहे. फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय.
Sometimes you search far & wide for something that was right next to you all along. We were looking for love, but we found friendship first. And then we found each other!
Welcome to my heart @FahadZirarAhmad It’s chaotic but it’s yours! ♥️✨? pic.twitter.com/GHh26GODbm— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2023
विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. “सीएए एनआरसीविरोधातील आंदोलनादरम्यान त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि तो चळवळीचा चेहरा बनला. त्याची पार्श्वभूमी गांधीवादी-समाजवादी आहे. त्याच्यासारखा पुरोगामी नेता राजकारणात आला आहे, ही चांगली गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि सीएएविरोधातील निदर्शनांदरम्यान फहादसोबत जवळून काम केलेले फिरोज मिठीबोरवाला यांनी दिली.
सीएएविरोधातील रॅलीमध्ये या दोघांची भेट झाली आणि त्याचवेळी दोघांचे विचारही जुळले. आता दोघांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र व्यग्र वेळापत्रकामुळे ती त्या लग्नाला उपस्थित राहू शकली नव्हती.
स्वरा आणि फहादने 6 जानेवारी रोजी न्यायालयात लग्नाची कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार या दोघांनी लग्न केलं आहे.