“तर मी गुदमरून मेले असते..”; स्वरा भास्करने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं काम न मिळण्यामागचं कारण
स्वराने राजकीय नेता फहाद अहमदशी 2023 मध्ये लग्न केलं. फहाद हा महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचा प्रदेशाध्यक्ष आहे. 23 सप्टेंबर 2023 रोजी स्वराने मुलीला जन्म दिला. फहाद आणि स्वराने त्यांच्या मुलीचं नाव राबिया असं ठेवलं आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने तिच्या या रोखठोक बोलण्याच्या स्वभावामुळे अनेकदा काम गमावल्याचा खुलासा केला आहे. ‘कनेक्ट सिने’ला दिलेल्या या मुलाखतीत स्वराने सांगितलं की तिच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे, बेधडक वक्तव्यांमुळे केवळ दिग्दर्शक-निर्मात्यांनीच नव्हे तर इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनीही तिच्यापासून फारकत घेतली. “मी पीडित आहे असं मला दाखवायचं नाहीये. कारण मीच या मार्गाची निवड केली आहे. मी मुक्तपणे बोलणार आणि समस्यांवर माझी मतं मांडणार, याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे. मी मौन राहणं निवडू शकले असते. ‘पद्मावत’ चित्रपटातील जोहर सीनबाबत मला खुलं पत्र लिहिण्याची काहीच गरज नव्हती”, असं स्वरा म्हणाली.
मोकळेपणे व्यक्त होण्याचा मार्ग निवडण्याविषयी ती पुढे म्हणाली, “तुम्ही माझ्याबद्दल अनेक तक्रारी करू शकता. मला पसंत किंवा नापसंत करू शकता. मला असं वाटतं की जे लोक माझा द्वेष किंवा तिरस्कार करतात, तेसुद्धा असं बोलू शकणार नाहीत की ही खोटारडी आहे किंवा फेक आहे. मी खऱ्या आयुष्यात जी व्यक्ती नाही तसं दाखवण्याचा प्रयत्न करते, असं ते बोलूच शकणार नाहीत. लोकांशी माझ्या संवादानुसार माझी मतं बदलत नाहीत. मी प्रत्येकाशी एकसारखीच वागते. जर मी हे सगळं बोलू शकली नसती तर गुदमरून मेले असते.”
“युद्धात मी माझ्यावर गोळी झेलायलाही तयार आहे, असं तुम्ही म्हणू शकता. पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला ती गोळी लागते, तेव्हा खरंच वेदना होतात. त्यामुळे मी जी मतं मांडली, त्याचे मला परिणामसुद्धा भोगावे लागले. माझी मुलगी राबियाच्या जन्माआधी, अभिनय हे माझं सर्वांत मोठं प्रेम होतं. मला अभिनय करायला खूप आवडायचं. मला विविध भूमिका साकारायच्या होत्या. पण मला तेवढ्या संधी मिळाल्या नाहीत. मला प्रोजेक्ट्स न मिळाल्याची आर्थिक आणि भावनिक किंमतसुद्धा मोजावी लागली. यात प्रतिष्ठेबद्दलची चिंतासुद्धा होती. मला वादग्रस्त अभिनेत्रीचा टॅग मिळाला. दिग्दर्शक, निर्माते, वितरक माझ्याबद्दल वाईट बोलू लागले. तुम्ही एक प्रतिमा बनवली जाते. या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही, अशी गोष्ट नाही. मला फरक पडत नाही, असं दाखवण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी मला त्रास होतोच. जी गोष्ट मला सर्वाधिक आवडते, ती करायला मिळत नसल्याचं खूप वाईट वाटतं”, अशा शब्दांत स्वराने तिच्या भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
स्वरा ‘जहा चार यार’ या चित्रपटात शेवटची झळकली. हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड फहाद अहमदची (आता पती) काय प्रतिक्रिया होती, याविषयी तिने सांगितलं. ती म्हणाली, “तो चित्रपट फार चालला नव्हता, पण मी फार मेहनत घेतली होती. कारण ती भूमिका माझ्या स्वभावाच्या विरोधातली होती. स्क्रिनिंगनंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू खरंच खूप मोठा त्याग केला आहेस, तुला मानावं लागेल. तू इतकी चांगली अभिनेत्री आहेत, तुला आणखी काम करायला हवं. आता तू गप्प राहा (मोकळेपणे मतं मांडणं बंद कर) आणि चित्रपटात काम कर. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चित्रपटात काम करायला न मिळाल्याचं दु:ख मी माझ्या आईवडिलांसमोरही व्यक्त करत नाही. माझा भाऊ त्याविषयी थोडंफार समजून घेतो पण आम्ही फारसं बोलत नाही. आता कुठे मुलीच्या जन्मानंतर मी त्याविषयी मोकळेपणे बोलू लागले आहे.”