नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केल्यानंतर विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळद, मेहंदी, संगीत अशा सर्वसामान्य कार्यक्रमांसोबतच स्वराने कव्वाली नाईट, कर्नाटक संगीत असे हटके कार्यक्रमसुद्धा आयोजित केले होते. त्यानंतर रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीतील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वराने तिच्या रिसेप्शनमध्ये पाकिस्तानी फॅशन डिझायनरने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. तर फहादने पांढऱ्या आणि सोनेरी रंगसंगतीची शेरवानी घातली होती.
समाजवादी पार्टीचे नेते सुहैब अन्सारीने या लग्नाच्या रिसेप्शनचे काही फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. ‘फहाद भाई आणि स्वराजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि समृद्धी असो’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेहंग्याच्या लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने पाकिस्तानी फॅशन डिझायनरला टॅग केलंय. यावरूनच तिला ट्रोल केलं जातंय.
स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केलं. या लग्नाचा खुलासा तिने जवळपास 40 दिवसांनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत केला. स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 2019 आणि 2020 मधील आंदोलनांची झलक पहायला मिळाली. या आंदोलनातच दोघांच्या कहाणीची सुरुवात झाली. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती.
या व्हिडीओत पुढे दाखवलं गेलं की गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली.
फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. 2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे.