मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नूच्या कुटुंबीयांना 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीचं दुःख सहन करावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने दंगलीतील त्या भयानक आठवणी सांगितल्या. तापसीचा जन्म त्या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी झाला. मात्र तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की दिल्लीच्या शक्तिनगरमध्ये राहणारं त्यांचं एकमेव शीख कुटुंब होतं. दंगलखोरांनी त्यांचं घर चारही बाजूंनी घेरलं होतं आणि तिचे कुटुंबीय घरात भीतीने लपून बसले होते. अखेर शेजाऱ्यांनी कसं तरी त्यांचे प्राण वाचवले.
दंगलीच्या आठवणी सांगताना तपासी म्हणाली की त्यावेळी माझ्या आई – बाबांचं लग्न झालं नव्हतं. तिची आई पूर्व दिल्लीत राहायची आणि बाबा शक्तिनगरमध्ये राहायचे. तिच्या वडिलांनी अनेकदा त्या घटनेबाबत सांगितल्याचं तापसी म्हणाली. तिची आई सांगायची की त्या ज्या ठिकाणी राहायच्या, तो परिसर सुरक्षित होता. मात्र जिथे तिचे वडील राहायचे, त्या परिसरात फक्त त्यांचंच एकमेव शीख कुटुंब होतं.
दंगलखोरांनी त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीला पाहून लोक घरातच आहेत असा समज करून घेतला होता. हातात तलवारी आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन लोक आमच्या घरासमोर पोहोचले होते. माझ्या कुटुंबियांनी घरातील सर्व लाइट्स बंद केले होते आणि आत लपून बसले होते. आमच्या घराला घेरलंय हे माहीत असताना पळून जाण्यात काही अर्थ नव्हता, असं तिने सांगितलं.
सुदैवाने तापसीचं कुटुंब ज्या घरात राहायचे, तिथे आणखी चार कुटुंब भाड्याने राहायचे. ते सर्व हिंदू कुटुंबीय होते आणि त्यांनीच तापसीच्या कुटुंबियांना वाचवलं होतं. दंगलखोरांना त्यांनी सांगितलं की आमचे कुटुंबीय घर सोडून पळून गेले आहेत. मात्र त्यांना माहीत होतं की आम्ही घरातच लपून बसलो आहोत. दंगलीत तापसीच्या कुटुंबीयांची गाडी जाळण्यात आली होती. पण सुदैवाने कुटुंबातील सर्व जण वाचले.
तापसीने सांगितलं की दंगलीच्या वेळी तिच्या कुटुंबियांसोबत जे घडलं ते कधीच विसरण्यासारखं नाही. 1984 च्या शीख दंगलीत हजारो लोकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं होतं. त्यात बहुतांश शीख कुटुंबांचा समावेश होता. या दंगलीवर अनेकदा चित्रपट बनवले गेले. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला जोगी हा चित्रपट शीख दंगलीवर आधारित होता.