‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेचं धूमधडाक्यात लग्न; भिडे मास्तरांनी मागितली ऑनस्क्रीन लेकीची माफी
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नानंतर मालिकेत भिडे मास्तरांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी तिची माफी मागितली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका असून गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत 2008 ते 2012 दरम्यान भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली. झीलने 28 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड आदित्य दुबेशी थाटामाटात लग्न केलं. लग्नाच्या तीन दिवसांनंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र ‘तारक मेहता..’मध्ये ऑनस्क्रीन तिच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी मात्र झीलची माफी मागितली आहे. या मालिकेत मंदार हे गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारत आहेत. तर झीलने त्यांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारली होती.
झीलच्या लग्नानंतर मंदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी झीलला लग्नाच्या शुभेच्छा तर दिल्या आहेतच, मात्र त्यासोबतच त्यांनी तिची माफीसुद्धा मागितली आहे. मंदार यांनी लिहिलं, ‘अभिनंदन झील ऊर्फ सोनू. तुझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षणांचा साक्षीदार मी होऊ शकलो नाही, यासाठी मी तुझी माफी मागतो. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो. मात्र माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच तुम्हा दोघांसोबत असतील. तुमचं वैवाहिक आयुष्य अत्यंत आनंदी राहो.’ मंदार यांच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्हाला टप्पूने किडनॅप तर केलं नव्हतं ना’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे चुकीचं आहे, मुलीच्या लग्नाला न जाणं ठीक नाही. इतकी काय नाराजी’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
View this post on Instagram
झील आणि आदित्य गेल्या 14 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर 28 डिसेंबर रोजी लग्न करत दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. झीलने 2012 मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली होती. तेव्हापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. याशिवाय ती तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते.