TMKOC : नवरात्रीच्या कार्यक्रमात जेठालालसोबत दिसला सुंदर; चाहत्यांनी विचारलं ‘दयाबेन कधी येणार?’
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सुंदर आणि जेठालालची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. नुकतीच ही जोडी नवरात्रीनिमित्त एकत्र दिसली होती. नवरात्रीच्या एका कार्यक्रमात मयूर वकानी आणि दिलीप जोशी यांनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. दयाबेन, जेठालाल, सुंदर, बबिताजी, सोढी ही नावं प्रेक्षकांच्या परिचयाची आहेत. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन यांच्या जोडीला तर चाहते खूप पसंत करतातच. मात्र त्याचसोबत आणखी एक अनोखी जोडी प्रेक्षकांना आवडते ती म्हणजे.. जेठालाल आणि सुंदर यांची. या दोघांच्या नात्यातील मजामस्ती ऑनस्क्रीन पहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. मालिकेत सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
मयूरने ‘गरबा नाईट’चे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे मोरवाली डान्स स्टेपसुद्धा करताना दिसत आहेत. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘या फ्रेममध्ये दयाबेनची कमतरता आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘भावोजी विचारतायत की दया कधी येणार’, असा मजेशीर सवाल दुसऱ्याने पोस्ट केला. ‘आज दांडियाच्या पासचे पैसे सुंदर देणार’, असंही काहींनी म्हटलंय. मालिकेत सुंदर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जेठालालकडून पैसे घेत असतो. तो स्वत: कधीच एक रुपया खर्च करत नाही. म्हणूनच नेटकऱ्यांनी ही कमेंट केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
नवरात्रीदरम्यान दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसुद्धा बऱ्याच वर्षांनंतर पापाराझींसमोर आली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा पती आणि मुलगासुद्धा होता. नवरात्रीमध्ये दिशा पारंपरिक गुजराती वेशभूषेत पहायला मिळाली. नवरात्रीच्याच एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ती पती आणि मुलासोबत आली होती. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.