दयाबेनच्या ‘तारक मेहता..’ सोडण्यावर पहिल्यांदाच बबिताजीने सोडलं मौन; म्हणाली..
अभिनेत्री दिशा वकानीने 2017 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडली होती. यात ती दयाबेनची भूमिका साकारत होती. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्याविषयी मौन सोडलं आहे. मुनमुन या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलल्या आणि त्यांच्या जागी नव्या कलाकारांची एण्ट्री झाली. मात्र एक अशी भूमिका आहे, जिथे अद्याप कोणत्या नव्या कलाकाराची वर्णी लागली नाही. ती भूमिका आहे दयाबेनची. अभिनेत्री दिशा वकानीने ‘तारक मेहता..’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारली होती. गरोदर असताना तिने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. बाळाच्या जन्मानंतर ती मालिकेत परत येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र अद्याप दिशाने मालिकेत पुनरागमन केलं नाही. तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचीही वर्णी लागली नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर दिशाबद्दल मालिकेच्या एका सहकलाकाराने मौन सोडलं आहे. ‘तारक मेहता..’मध्ये बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशाबद्दल व्यक्त झाली.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुनमुन म्हणाली, “आम्ही नेहमीच अशा लोकांची आठवण काढतो, जे मालिका सोडून गेले आहेत. मला दिशाची खूप आठवण येते. जेव्हा आम्ही एकमेकांना विनोद सांगतो, तेव्हा अचानक दिशा आठवते. दिशाने असं म्हटलं होतं, दिशाने तसं म्हटलं होतं.. अशाच आमच्या गप्पा रंगत जातात. तिच्यासोबत माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. तिला जेव्हा कधी अनोळख्या नंबरवरून फोन यायचे, तेव्हा ती तिचा आवाज बदलून बोलायची. हे फारच गमतीशीर होतं.”
View this post on Instagram
दिशा वकानीने 2017 मध्ये ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली होती. बाळंतपणासाठी तिने ब्रेक घेतला होता, मात्र नंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशाला मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न निर्मात्यांकडून झाले. मात्र तिने कुटुंबीयांना प्राधान्य देत मालिकेत परतण्यास नकार दिला. या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं की ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत.
मालिकेत दयाबेनच्या एण्ट्रीबाबतचा सीन अनेकदा दाखवण्यात आला, मात्र कधीच अभिनेत्रीची एण्ट्री झाली नाही. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या सात वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.