Taarak Mehta | वयाच्या 50 व्या वर्षी ‘तारक मेहता’ करणार दुसरं लग्न; 9 वर्षांच्या संसारानंतर पत्नीला घटस्फोट
मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ याच्याविषयी आम्ही बोलत आहोत. सचिनचं हे दुसरं लग्न आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. गेल्या काही काळात या मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलल्या. जुन्या कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. आता या मालिकेतील तारक मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. मालिकेत नव्या ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ याच्याविषयी आम्ही बोलत आहोत. सचिनचं हे दुसरं लग्न आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.
येत्या 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सचिन श्रॉफच्या होणाऱ्या पत्नीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र तो बहिणीच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार असल्याचं कळतंय. हे अरेंज मॅरेज असून सचिनची होणारी पत्नी ग्लॅमर विश्वातील नाही. ती इव्हेंट ऑर्गनायझर आणि इंटेरिअर डिझायनर असल्याचं समजतंय.
View this post on Instagram
सचिनने टेलिव्हिजन अभिनेत्री जुही परमारशी 2009 मध्ये लग्न केलं होतं. जयपूरमधील पॅलेमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांना समायरा श्रॉफ ही मुलगी आहे. जानेवारी 2018 मध्ये जुहीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जुलै 2018 मध्ये दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर समायराचं पालकत्व जुहीला देण्यात आलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याच्या 5 वर्षांनंतर आता सचिन आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
‘तारक मेहता..’ या मालिकेत गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेते शैलेश लोढा हे तारक मेहताची भूमिका साकारत होते. मात्र त्यांनी अचानक मालिका सोडली. त्यानंतर त्यांची जागा सचिन श्रॉफने घेतली.
शैलेश यांनी मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांचं मानधन थकवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यावर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनीदेखील मौन सोडलं होतं.
“आम्ही पैसे दिले नसल्याची जी चर्चा होतेय, त्यात काही तथ्य नाही. मी कोणाच्या मेहनतीचे पैसे माझ्या खिशात ठेवून काय करू? देवाने मला बरंच काही दिलंय, सर्वांत जास्त तर मला प्रेम मिळालं आहे. मी लोकांना पैसे दिले नाही, या चर्चा खोट्या आहेत. मला आनंद आहे की मी लोकांना हसवतो”, असं असित मोदी म्हणाले होते.