कोट्यवधी संपत्तीचा मालक ‘जेठालाल’ एका दिवसात कमावतो इतके लाख रुपये
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे घराघरात लोकप्रिय आहेत. अभिनयक्षेत्रात जवळपास तीन दशकांपासून काम करणारे दिलीप जोशी हे कोट्यवधींचे मालक आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय. यामध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांना ओळखत नाही, अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. दिलीप जोशी हे जवळपास तीन दशकांपासून अभिनयक्षेत्रात काम करत आहेत. मात्र ‘तारक मेहता..’ या मालिकेमुळे त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हे या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. एका एपिसोडसाठी ते तगडं मानधन घेतात. दिलीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात..
दिलीप जोशी हे आज 26 मे रोजी त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यांनी याआधी बऱ्याच चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता ही ‘तारक मेहता..’ या मालिकेतून मिळाली. आपल्या विनोदबुद्धीने आणि अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या दिलीप जोशींच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांना बेरोजगार राहावं लागलं होतं. मात्र आज ते कोट्यवधींचे मालक आहेत.
View this post on Instagram
दिलीप जोशी यांची एकूण संपत्ती 47 कोटींच्या घरात आहे. ‘कोइमोइ’ या वेबसाइटने 2023 मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती 135 टक्क्यांनी वाढली आहे. दिलीप जोशी यांची संपत्ती 20 कोटींनी वाढून 47 कोटी रुपये इतकी झाली आहे. ते एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेतात. इतकंच नव्हे तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून ते एका आठवड्याला 7.5 लाख रुपये कमावतात. मालिकेशिवाय ते जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाद्वारेही चांगला पैसा कमावतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते सक्रिय असून विविध रिल्स आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
गुजरातच्या पोरबंदर इथं जन्मलेल्या दिलीप जोशी यांच्या कुटुंबात पत्नी जयमाला जोशी, मुलगा ऋत्विक आणि मुलगी नियती यांचा समावेश आहे. मुंबईत त्यांचं आलिशान घर असून त्याची किंमत कोटींच्या घरात आहे.