WWE मध्ये एण्ट्री पक्की..; वाढलेल्या वजनामुळे तमन्ना भाटिया ट्रोल
अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तमन्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेत्री तमन्ना भाटियाने टॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘स्त्री 2’ या चित्रपटातील तिचं आयटम साँग चांगलंच गाजलं. याशिवाय अभिनेता विजय वर्मासोबतच्या अफेअरमुळेही ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या तमन्ना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एरव्ही आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांना घायाळ करणाऱ्या तमन्नाला आता मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील तमन्नाचा लूक आणि तिचं वाढलेलं वजन पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. विविध पापाराझी अकाऊंट्सवर तमन्नाचे हे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.
यातील एका व्हिडीओमध्ये तमन्ना जीन्स आणि बॅकलेस टॉपमध्ये दिसून येत आहेत. या कपड्यांमध्ये तमन्नाचं वाढलेलं वजन स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर दुसरा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असून रेड कार्पेटवर ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसून येतेय. यावेळी तिने हिरव्या रंगाचा सिल्क गाऊन ड्रेस परिधान केला आहे. या दोन्ही व्हिडीओंमध्ये तमन्नाचं वाढलेलं वजन दिसून येत असल्याने आणि तिच्या कपड्यांच्या निवडीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
‘ही किती जाड दिसतेय. शरीराच्या आकारानुसार तरी कपडे घालावेत,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘जिम ट्रेनरने तिला WWE मध्ये पाठवण्याची तयारी केलेली दिसतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तमन्नाला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची खूप गरज आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. तर काहींनी तमन्नाचं कौतुकही केलंय. ‘जाड दिसत असली तरी तमन्ना खूप सुंदर आहे’, असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय.
तमन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा तिचा आणि विजय वर्माचा किसिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी माध्यमांसमोर जाहीरपणे एकमेकांबद्दलचं प्रेम कबुल केलं. विजय आणि तमन्ना आता खुलेपणाने डेट करताना दिसतात. जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला होता, “आम्ही दोघं एकमेकांना डेट करतोय. दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहोत. मी तिच्या प्रेमात अक्षरश: वेडा आहे. माझ्या आयुष्यातील ‘विलेन’चा टप्पा आता संपलेला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे.”