प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; एकाच दिवशी भाऊ-बहिणीला गमावलं, इंडस्ट्रीवर शोककळा
वेंकट बोसने तमिळ चित्रपटांसोबतच टीव्हीमध्येही काम केलं आहे. तो एक डबिंग आर्टिस्टसुद्धा आहे. त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. अभिनेता होण्यासाठी तो वयाच्या 17 वर्षी चेन्नईला आला होता.
चेन्नई : तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक वेंकट बोसने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्याच्यावर एकाच दिवशी दु:खाचं मोठं डोंगर कोसळेल. एकाच दिवशी त्याच्या भाऊबहिणीचं निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वेंकट बोसच्या भावाचं आणि बहिणीचं एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेबद्दल कळताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे. वेंकट बोसचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. आधी त्याच्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला. बहिणीच्या निधनाच्या दु:खातून सावरण्याआधीच त्याच्या भावालाही हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समोर आलं. वेंकट बोसच्या भावानेही त्याच क्षणी अखेरचा श्वास घेतला.
बहिणीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
रिपोर्ट्सनुसार, वेंकट बोसच्या बहिणीची शुक्रवारी 23 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बहिणीच्या निधनाच्या वृत्ताने वेंकट बोसच्या कुटुंबीयांना धक्का बसला होता. हाच धक्का भाऊ रंगनाथन सहन करू शकला नाही. बहिणीच्या अंत्यसंस्कारावेळीच तिचं पार्थिव पाहून रंगनाथन बेशुद्ध झाले आणि तिथेच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
View this post on Instagram
बहिणीच्या अंत्यसंस्कारादरम्यान भावाचंही निधन
एकाच दिवशी कुटुंबातील सर्वांत जवळच्या दोन व्यक्तींना गमावल्यानंतर वेंकट बोस पूर्णपणे खचले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट लिहित त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. वेंकट बोसने सोशल मीडियावर बहिणीचा फोटो पोस्ट करून तिच्या निधनाची माहिती दिली होती. त्यावर अनेकांनी कमेंट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
वेंकट बोसचं करिअर
वेंकट बोसने तमिळ चित्रपटांसोबतच टीव्हीमध्येही काम केलं आहे. तो एक डबिंग आर्टिस्टसुद्धा आहे. त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. अभिनेता होण्यासाठी तो वयाच्या 17 वर्षी चेन्नईला आला होता. मात्र इंडस्ट्रीत अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने ऑटो रिक्षा चालविण्यास सुरुवात केली होती. त्याचसोबत तो विविध ऑडिशन्ससुद्धा देत होता. अचानक एकेदिवशी त्याला ‘मेट्टी ओली’ या तमिळ टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.