माझ्या भाषेवरून लोक हसायचे..; ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्याकडून इंडस्ट्रीचं वास्तव उघड
'तान्हाजी' या चित्रपटातील चुलत्या आठवतोय का? मराठमोळा अभिनेता कैलाश वाघमारेनं ही भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कैलाश त्याच्या अनुभवांविषयी, फिल्म इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलाश वाघमारे याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीतल्या विविध मुद्द्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इंडस्ट्रीतील दुटप्पीपणा, रंगामुळे पचवावे लागलेले नकार, भाषेमुळे झालेला अपमान यांसारख्या गोष्टींवर त्याने भाष्य केलं. कैलाशने ‘तान्हाजी’च्या आधी विविध नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे त्याचं नाटक विशेष गाजलं. या नाटकानंतर त्याला विविध भूमिका मिळत गेल्या. मात्र इंडस्ट्रीत काम करताना त्याला काही धडा शिकवणारे अनुभवसुद्धा आले.
“माझा ठराविक ग्रुप नाही”
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कैलाशने सांगितलं, “मी जेव्हा मित्रांसोबत असतो, मग ते दिग्दर्शक मित्र, निर्माते मित्र किंवा पत्रकार मित्र असो, तेव्हा त्यांच्याकडून मला समजतं की एखाद्या चित्रपटातून मला काढून टाकण्यात आलं. ते असं का झालं, याचं कारणच मला कळत नाही. याचं उत्तर मी स्वत:ला विचारलं तर मी लोकांमध्ये जास्त मिसळत नाही, त्यामुळे नाकारलं गेल्याचं वाटतं. माझा ठराविक ग्रुप नाही. एक ग्रुप असतो आणि त्याच ग्रुपमधली माणसं तुम्हाला काम देत असतात किंवा तुमच्या चित्रपटाचं प्रमोशन करत असतात.”
“नकाराचं आणखी एक कारण म्हणजे ग्लॅमर. हा फक्त ग्रामीण दिसतो किंवा याला जमेल का, हा आपल्या ग्रुपमध्ये सेट होऊ शकेल का, असे प्रश्न त्यांच्या मनात असतात. मी मुलाखतींमध्येही सडेतोड बोलतो. जे आहे ते बोलतो म्हणून बाकिच्यांना वाटतं की हा आपल्या सेटअपमध्ये बसेल का,” असं तो पुढे म्हणाला.
“भाषेवरून लोक हसायचे”
मूळचा जालना इथल्या कैलाशला मुंबईत आल्यानंतर भाषेमुळे बराच संघर्ष करावा लागला. याविषयी त्याने सांगितलं, “जालन्यात पण माझ्यासारखेच बोलणारे आजूबाजूला होते. त्यामुळे भाषेची समस्या तेव्हा नव्हती. मी कथाकथन, काव्यवाचन करायचो, त्याची बक्षीसं मिळायची.. तेव्हा गावातल्या लोकांना वाटायचं की आपल्या पोराने काहीतरी मोठं केलं. त्यांना जसं वाटायला लागलं तसं मलाही वाटू लागलं की मी जगावेगळं काहीतरी केलंय. जेव्हा मुंबई विद्यापिठात आलो, तेव्हा आणि-पाणी अशा भाषेच्या समस्या निर्माण झाल्या. मुंबई विद्यापिठात नाटकं शिकणं बाजूला राहिलं आणि इथल्या लाइफस्टाइलशी जुळवून घेणं, भाषेशी जुळवून घेणं, माणसांशी जुळवून घेणं, हे सगळं करता करता दोन वर्षे निघून गेली. हळूहळू मी न च्या जागी ण हे जाणीवपूर्वक बोलू लागतो. लोक हसायचे मला.”
View this post on Instagram
“प्रमाण भाषेवाचून काही अडलं नाही”
“शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक माझ्या जालन्याच्या भाषेत होतं. ते नाटक प्रेक्षकांनी स्वीकारलं तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. ते नाटक खूप गाजलं. तिथून मला पुढचा चित्रपट मिळाला. त्यामुळे प्रमाण भाषेवाचून माझं काही अडलं नाही. मला तशाच भूमिका मिळू लागल्या. पण तुम्ही जर म्हणत असाल की ही प्रमाण आणि ही ग्रामीण भाषा, ही चांगली आणि ती वाईट तर त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. माझ्या गावची जी भाषा आहे, तिथली लोकं जी भाषा बोलतात.. ती शुद्ध भाषा. मुंबईतली भाषा ही इथली शुद्ध भाषा,” असं मत कैलाशने व्यक्त केलं.
इंडस्ट्रीतल्या ‘हिरो’ या संकल्पनेविषयी बोलताना कैलाश म्हणाला, “गोरागोमटा, बॉडीबिल्डर हिरो असावा.. हे पॅरामीटर ठरलेले आहेत. पण ते आता मोडीत निघालंय. मला सुरुवातीला हिरोच व्हायचं नव्हतं. कारण माझ्या डोक्यात हिरोची कल्पना तशी होती. पण जसजसं मला काम मिळत गेलं, तेव्हा समजलं की सर्वसामान्य व्यक्तीही हिरो किंवा नट असतो. तान्हाजीनंतर मला खूप कामं मिळाली, पण त्याच्या २५ दिवसांनंतर लॉकडाऊन लागलं आणि सगळं कोलमडून पडलं. पण लॉकडाऊनंतर पुन्हा काम सुरू झालं.”