मुंबई : 6 जानेवारी 2024 | अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी नृत्यक्षेत्रात तिने उत्तम कामगिरी केली आहे. सध्या ‘झलक दिखला जा 11’ या डान्स शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. या शोमध्ये तिच्या नृत्याचं परीक्ष आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक होत आहे. या मालिकेशी संबंधित दिलेल्या एका मुलाखतीत तनिषा तिच्या करिअर आणि अपयशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत तनिषाने सांगितलं की जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा तिचा मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर ती काही काळासाठी कोमामध्ये गेली होती.
तनिषाने 2003 मध्ये ‘श्श्श्श..’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाल्याचा खुलासा तिने केला. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात तिला गंभीर दुखापत झाली आणि ती कोमात गेली होती. तनिषाची परिस्थिती पाहून आई तनुजा यांना वाटलं होतं की त्यांच्या मुलीचं निधन झालं आहे. याविषयी तनिषा म्हणाली, “पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझा अपघात झाला होता. तो अत्यंत भयानक अपघात होता. मला गंभीर दुखापत झाली होती आणि काही वेळासाठी मी बेशुद्ध होते. त्यानंतर माझी अवस्था पाहून आईला वाटलं की मी मेले. ती खूप घाबरली होती.”
“डॉक्टरांनी सांगितलं होतं की यापुढे मी काम करू शकणार नाही. मात्र ज्या चित्रपटात मी काम करत होते, त्या दिग्दर्शकांना मी तो चित्रपट पूर्ण करावा अशी इच्छा होती. जर तनिषाने चित्रपट पूर्ण केलं नाही तर तो चित्रपट बंद करावा लागेल, असंच ते थेट म्हणाले होते. अपघातानंतर काही दिवस माझ्या डोक्यावर सूज होती आणि त्याच अवस्थेत मी शूटिंग पूर्ण केलं होतं,” असं ती पुढे म्हणाली.
तनिषा मुखर्जीने ‘श्श्श्श..’ या चित्रपटानंतर ‘नील अँड निक्की’, ‘सरकार’, ‘टँगो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्येही तिने भाग घेतला होता. या सिझनमध्ये तिची आणि अरमान कोहलीची जोडी विशेष चर्चेत होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. तनिषा आजही सिंगल आहे.