“तिच्याइतकं माझं करिअर चांगलं..”; बहीण काजोलशी होणाऱ्या तुलनेवर अखेर तनिषाने सोडलं मौन
काजोल आणि तनिषा या अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक-लेखक-निर्माते शोमू मुखर्जी यांच्या मुली आहेत. तनिषा लवकरच 'वीर मुरारबाजी' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय अरेकर दिग्दर्शित हा ऐतिहासिक चित्रपट असून तो हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. फिल्म इंडस्ट्रीत ते स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. मात्र त्यांच्याच कुटुंबातील इतर व्यक्तींना अभिनयक्षेत्रात फारसं यश मिळालं नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तनिषा मुखर्जी. तनिषा ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि काजोलची बहीण आहे. करिअरच्या बाबतीत तिची नेहमीच बहिणीशी तुलना केली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनिषा या तुलनेबाबत मोकळेपणे व्यक्त झाली. तनिषाने 2003 मध्ये ‘श्श….’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र तिला काजोलइतकं यश मिळालं नाही. काजोलने 1992 मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या पहिल्यावहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तनिषा म्हणाली, “मला या गोष्टींमुळे आता काही फरक पडत नाही. मी माझ्या बहिणीकडे बघून माझी तुलना करू शकत नाही. मी स्वत:ची तुलना इतर अभिनेते किंवा अभिनेत्यांशीही करत नाही. तर मग माझ्या बहिणीशी का करू? प्रत्येक अभिनेता आणि स्टारचा वेगळा प्रवास असतो, असं मला वाटतं. मी हे मान्य करते की माझं करिअर माझ्या बहिणीच्या करिअरइतकं चांगलं नाही. पण तिने वयाच्या सोळाव्या वर्षी करिअरची सुरुवात केली होती. ती इंडस्ट्रीत असल्यामुळे मला खूप मदत झाली. मला ज्या गोष्टींची गरज होती, ते मिळाल्याने मी तिच्या करिअरचे आभार मानते. अखेर पाहिलं तर माझं करिअर खूप कम्फर्टेबल राहिलं आहे. मला काम करण्याची गरज नव्हती. त्या पैलूने विचार केल्याने मी कधीच तुलना करत नाही. माझ्या मते, या जगाला तुलना करायला खूप आवडते. पण मी त्या विश्वात स्वत:ला अडकवून घेत नाही.”
View this post on Instagram
बहिणीविषयी बोलताना तिने पुढे सांगितलं, “लहानपणी काजोल खूप मस्तीखोर होती. माझ्यापेक्षा जास्त ती अडचणींमध्ये सापडायची. लहानपणी आमच्यात भांडणंसुद्धा खूप व्हायची. माझे वडील आम्हाला टॉम आणि जेरी म्हणायचे. माझं माझ्या आईसोबत मैत्रीचं नातं आहे आणि माझी बहीण माझ्यासाठी आईसारखी आहे. ती स्वभावाने खूप कठोर आहे. ती आम्हा सर्वांची आईच आहे.”