‘माफी न मागताच..’; तारा सुतारियाच्या आईचा आदर जैनला अप्रत्यक्ष टोला
कपूर कुटुंबातील आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांचा रोका नुकताच पार पडला. आदर याआधी अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. ब्रेकअपनंतर त्याने ताराचीच मैत्रीण आलेखाला प्रपोज केलं होतं.
राज कपूर यांचा नात आणि रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैनने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी साखरपुडा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते. आलेखाच्या आधी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. विशेष म्हणजे आलेखा ही तारा आणि आदर या दोघांची मैत्रीण होती. ताराच्या मैत्रिणीशीच अफेअर केल्याने आदरवर बरीच टीकासुद्धा झाली होती. आता त्याच्या साखरपुड्यानंतर ताराच्या आईची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे त्यांनी आदरवर निशाणा साधल्याचं समजतंय.
ताराच्या आईची पोस्ट
‘योग्य माफी न मागता किंवा प्रकरण न संपवता आयुष्यात पुढे निघून गेलेल्या प्रत्येकाचं अभिनंदन. कारण ते सोपं नाही’, अशी पोस्ट ताराच्या आईने लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये आदर आणि तारा यांचं नातं एकमेकांच्या संमतीने किंवा व्यवस्थितरित्या संपलं नव्हतं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. तारासोबतचं नातं नीट न संपवताच आदरने आलेखाशी साखरपुडा केला, यावरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
आदर आणि ताराच्या साखरपुड्यादरम्यान ताराचीही एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली होती. शनिवारी आदर आणि आलेखाचा रोका पार पडला आणि शनिवारीच ताराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली होती. ताराने इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचा फोटो शेअर केला होता. त्यावर तिने लिहिलं, ‘शोमेमाकचं नवं पुस्तक मी नुकतंच घेतलंय ‘कर्मा इज अ बीच’. हे पुस्तक वाचण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तुम्हीसुद्धा ॲमेझॉनवरून हे पुस्तक खरेदी करू शकता.’ या पोस्टमधील पुस्तकाच्या नावावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.
तारा आणि आदर यांनी 2020 मध्ये नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याच्या आधीपासूनच दोघं एकमेकांना डेट करत होते. ताराला अनेकदा कपूर कुटुंबीयांच्या कार्यक्रमात आदरसोबत पाहिलं गेलं. इतकंच काय तर या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र त्याआधीच त्यांचा ब्रेकअप झाला. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात.