‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी
सासू-सुनेची जोडी प्रेक्षकांना एकत्र डान्स परफॉर्म करताना दिसणार आहे. 'आई कुठे काय करते'च्या (Aai Kuthe Kay Karte) प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच असेल. यासाठी दोघींनी तयारीला सुरुवात केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कलाकारांचं दमदार अभिनय, मालिकेच्या कथानकात येणारी रंजक वळणं यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या गायनाचेही व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. तर दुसरीकडे मालिकेत अरुंधतीची सून अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेची (Ashvini Mahangade) सोशल मीडियावर वेगळी लोकप्रियता आहे. मालिकेत अनघा नेहमीच अरुंधतीच्या बाजूने खंबीरपणे उभी असते. आता हीच सासू-सुनेची जोडी प्रेक्षकांना एकत्र डान्स परफॉर्म करताना दिसणार आहे. ‘आई कुठे काय करते’च्या प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच असेल.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अरुंधती-अनघाचा धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यासाठी दोघी जोमाने तयारी करत आहेत. या तयारीचा फोटो अश्विनीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. मधुराणी आणि अश्विनी नेमकं कोणत्या गाण्यावर परफॉर्म करतील, हे अद्याप समजलेलं नाही. मात्र या दोघींचा एकत्र डान्स पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे अरुंधती घर सोडून गेल्यानंतर आता अनघा आणि अभिषेकमधील वादामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनघाने नेहमीच तिची बाजू स्पष्टपणे मांडली आहे. अभिषेकचा स्वभाव मात्र तिच्याविरुद्ध आहे. तर दुसरीकडे आशुतोषच्या मदतीने अरुंधतीला राहायला घर मिळालं आहे. अरुंधतीचं पुढचं पाऊल काय असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?
संबंधित बातम्या: एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?