14 वर्षांपूर्वी नागासोबत सीन, ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर मिलिंद गवळींचं ‘त्या’ बालकलाकाराशी रियुनियन
मी माझ्यासाठी नाही तर मुलासाठी घाबरलो होतो, तो खूप लहान होता आणि त्याला काहीच समजत नव्हते, म्हणून आजपर्यंत मला शूटचा तो दिवस आठवतो, असं लिहित अभिनेते मिलिंद गवळींनी फोटो शेअर केला आहे.
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. सध्या मालिकांमध्ये रमलेल्या मिलिंद गवळींनी आपली अभिनय कारकीर्द चित्रपटांतून सुरु केली होती. ‘काळ भैरव’ या 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील बालकलाकाराशी मिलिंद गवळींची नुकतीच भेट झाली. नागासोबत सीन केलेल्या समर्थची मिलिंद यांनी ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर भेट घेतली.
मिलिंद गवळींची इन्स्टाग्राम पोस्ट काय?
नागासोबात खेळणारा चिमुरडा… समर्थ मला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर भेटायला आला. मी त्याला बरोबर 14 वर्षांनी भेटतोय. सतीश रणदिवे दिग्दर्शित ‘काळ भैरव’ या सिनेमात त्याने माझ्या मुलाची भूमिका केली, तेव्हा तो जेमतेम वर्षभराचा होता. नागासोबत समर्थचे सीन शूट केले, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. कोल्हापुरातील किशाभाऊ मळ्यातील शूटिंगचा तो दिवस मला अजूनही आठवतो. समर्थचे आई-बाबा तिथेच होते. मी त्यांना विचारलं होतं, की “तुमच्या मुलाला सापाच्या जवळ जाऊ देताना तुम्हाला भीती नाही का वाटत?” त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सर्पमित्र आहोत आणि बरीच वर्ष सापांना हाताळत आहोत, अशी आठवण मिलिंद गवळींनी इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितली आहे.
म्हणून शूटचा तो दिवस अजूनही आठवतो
मी माझ्यासाठी नाही तर मुलासाठी घाबरलो होतो, तो खूप लहान होता आणि त्याला काहीच समजत नव्हते, म्हणून आजपर्यंत मला शूटचा तो दिवस आठवतो. मला अजूनही ते खूप धोकादायक होतं, असं वाटतं, समर्थ बाळ त्याला स्पर्श करुनही कोब्रा काहीच करत नव्हता, असं मिलिंद गवळींनी लिहिलंय.
अभिनेत्री शीतल क्षीरसागरमुळे भेट
आज जेव्हा ‘आई कुठे काय करते’मध्ये निलिमाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागरने मला सांगितले, की तिच्या अत्यंत जवळच्या कौटुंबिक मित्राचा मुलगा समर्थने 15 वर्षापूर्वी “काळ भैरव” मध्ये माझ्या मुलाची भूमिका साकारली होती, तो मला येऊन भेटू इच्छितो, कारण तो रत्नागिरीहून मुंबईला आला होता. मी पण खूप उत्साहित झालो होतो. तो काही वेळासाठी भेटून गेला.
2006 च्या “काळ भैरव” सिनेमाच्या शूटच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, शूटिंग करताना माझ्या अंगावर काटा आला, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासाठी काही जुने फोटो शेअर करत आहे, असं म्हणत मिलिंद गवळींनी आताच्या आणि तेव्हाच्या फोटोंचा कोलाज पोस्ट केला आहे.
पाहा इन्स्टाग्राम पोस्ट :
View this post on Instagram
संबंधित बातम्या :
.’आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ
Aai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच